कितीये एअरटेल कंपनीचे प्रमुख सुनील मित्तल यांची सॅलरी? इंक्रीमेंटचा आकडा वाचून व्हाल अचंबित!
देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांच्या वार्षिक पगारात मोठी वाढ करण्यात आली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात त्यांचा पगार 92 टक्क्यांनी वाढून, 32.27 कोटी झाला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात भरती मित्तल यांचे वेतन 16.72 कोटी रुपये होते. ज्यात आता तब्बल 15.50 कोटी रुपये इतकी वाढ करण्यात आली असून, आता त्यांना वार्षिक 32.27 कोटी रुपये वेतन मिळणार आहे.
एअरटेलमध्ये कोणाची किती हिस्सेदारी?
जून 2024 पर्यंत भारती एअरटेलमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी सुमारे 53.17 टक्के होती. तर लोकांचे 46.77 टक्के शेअर्स आहेत. बीएसई ॲनालिटिक्सनुसार एअरटेलचे मार्केट कॅप 8.50 लाख कोटी रुपये आहे. हा बीएसई सेन्सेक्सचा भाग आहे. कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 5 रुपये आहे. भारती एअरटेलने दिलेल्या माहितीनुसार, 30 जून 2024 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीतील लेखापरीक्षित आर्थिक निकालांवर (स्टँडअलोन आणि कन्सोलिडेटेड) विचार करण्यासाठी आणि मंजूर करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची 5 ऑगस्ट 2024 रोजी बैठक होणार आहे.
हेही वाचा : बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा होणार? स्टेट बँकेच्या अध्यक्षांनी दिली मोठी माहिती!
कोण आहेत सुनील भारती मित्तल?
सुनील भारती मित्तल हे भारतातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक आहेत. ते प्रामुख्याने दूरसंचार क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी ओळखले जातात. त्यांनी भारती एअरटेल या कंपनीची स्थापना केली. जी आज भारतातील आणि जगातील अनेक भागांमधील सर्वात मोठ्या दूरसंचार नेटवर्कपैकी एक आहे. मोबाईल सेवांव्यतिरिक्त, कंपनी ब्रॉडबँड, डिजिटल टीव्ही आणि इतर दूरसंचार सेवा देखील पुरवते.
भारताव्यतिरिक्त आफ्रिका आणि आशियातील अनेक देशांमध्ये एअरटेलची सेवा कार्यरत आहे. एअरटेल 5-जी तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवांवर लक्ष केंद्रित करून भविष्यात वाढण्यास तयार आहे. भारताला डिजिटल अर्थव्यवस्था बनवण्यात योगदान देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.