मिठाई वाल्याच्या मुलाने उभारली 35 हजार कोटींची बँक; कधीकाळी घर खर्चासाठी घ्यायचा शिकवणी वर्ग!
जगातील अनेक यशस्वी व्यक्तींची यशोगाथा ऐकल्यास दिवस-रात्र मेहनत घेणे, हेच त्यांच्या यशाचे गमक असते. आज आपण अशाच एका यशस्वी व्यक्तीची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी तब्बल ३५ हजार कोटींची बँक उभी केली आहे. विशेष म्हणजे त्यांचे वडील हे मिठाईची छोटी दुकान चालवत होते. तर ते स्वतः आपला घर खर्च चालवण्यासाठी शिकवणी वर्ग चालवत होते. मात्र, एक कल्पना डोक्यात आली. आणि त्यांनी मागे पुढे कोणतीही पार्श्वभूमी नसताना बँकेची सुरुवात केली. विशेष म्हणजे ही बँक सध्या देशातील नामांकित बँक असून, ती आज ३५ हजार कोटींची बँक बनली आहे.
35 हजार कोटी आहे बँकेचे मार्केट कॅप
चंद्रशेखर घोष असे त्यांचे नाव असून, त्यांनी देशातील नामांकित बँक असलेल्या बंधन बँकेची स्थापना केली. आज बंधन बँकेच्या देशातील सर्व राज्यांमध्ये शाखा आहेत. २००१ साली चंद्रशेखर घोष यांनी एका एनजीओच्या स्वरूपात बँकेची सुरुवात केली होती. त्यानंतर ही बँक देशातील सर्वात मोठी लघुउद्योग व्यवसाय कर्ज संस्था बनली. तर २०१५ मध्ये तिचे बंधन बँकेमध्ये रूपांतर झाले. आज बंधन बँकेचे मार्केट कॅपिटल तब्बल 35 हजार कोटी रुपये इतके आहे.
काढलेत अत्यंत हलाखीचे दिवस
चंद्रशेखर घोष हे मूळचे आगरतळा (त्रिपुरा) येथील असून, त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. त्यांच्या वडिलांचे छोटेसे मिठाईचे दुकान होते. ज्यातून कसा तरी घरखर्च चालवला जायचा. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही चंद्रशेखर शिक्षण सुरूच ठेवले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते, 1978 मध्ये ढाका (बांगलादेश) येथे गेले. तेथून चंद्रशेखर यांनी सांख्यिकी विषयात पदवी घेतली. त्यानंतर काही काळ घर खर्च भागवण्यासाठी मुलांच्या शिकवणी देखील घेतल्या. त्यानंतर त्यांना ढाका येथे राहत असताना 1985 मध्ये आंतरराष्ट्रीय विकास ना-नफा संस्थेत (बीआरएसी) नोकरी मिळाली. त्यातूनच त्यांना भारतात येऊन बँक सुरु करण्याची प्रेरणा मिळाली.
हेही वाचा : 2047 पर्यंत भारत ‘विकसित राष्ट्र’ होणार का? जागतिक बँक म्हणतीये अजून लागणार ‘इतके’ वर्ष!
2015 मध्ये मिळाला बँकेचा परवाना
1997 साली चंद्रशेखर घोष कोलकात्याला आले. मात्र, काही वर्षांच्या विचारांती त्यांनी 2001 मध्ये ‘बंधन बँकेची स्थापना केली. विशेष म्हणजे चंद्रशेखर घोष यांनी बंधन बँक सुरु करण्यासाठी मित्र आणि नातेवाईकांकडून सुमारे दोन लाख रुपये उधारीने घेतले होते. त्यावेळी महिलांना कर्ज देणारी मायक्रो फायनान्स कंपनी म्हणून बंधन बँकेची स्थापना झाली होती. 2009 मध्ये बंधन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) म्हणून नोंदणीकृत झाली. 2015 मध्ये बंधन बँकेला बँकिंग परवाना मिळाला आणि तिचे नाव ‘बंधन बँक’ असे झाले.
बँकेच्या नफ्यात 47 टक्क्यांनी वाढ
देशभरात आज बंधन बँकेच्या सर्व राज्यांमध्ये सुमारे 6300 शाखा आहेत. बँकेचे 3.44 कोटींहून अधिक खातेदार आहेत. 30 जून 2024 पर्यंत बँकेच्या ठेवींमध्ये सुमारे 1.33 लाख कोटी रुपये आहे. मागील आठवड्यातच बँकेने चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीचे (एप्रिल-जून) निकाल जाहीर केले होते. त्यानुसार बँकेच्या निव्वळ नफ्यात 47 टक्क्यांनी वाढ झाली आहे.