
बिल गेट्स की सत्या नडेला... मायक्रोसॉफ्टचे मालक कोण? किती आहे कंपनीची एकूण संपत्ती?
शुक्रवारी (ता.१९) सकाळपासून जगभरातील संगणक आणि लॅपटॉपवर ब्लू स्क्रीन ऑफ डेथची (बीएसओडी) समस्या जाणवत आहे. ज्यामुळे एकच गोंधळ उडाला. विशेष म्हणजे शुक्रवारी जगभरातील उड्डाणे, बँका, मीडिया संस्था आणि कंपन्यांच्या कामकाजावर याचा परिणाम दिसून आला. इंटरनेट व्यत्ययांची माहिती देणारे संकेतस्थळ डाउन डिटेक्टरच्या माहितीनुसार, व्हिसा, एडीटी सिक्युरिटी, ॲमेझॉन आणि अमेरिकन एअरलाइन्स तसेच डेल्टा यासह अनेक एअरलाइन्ससाठी व्यत्यय या समस्येमुळे अडचण आली. मात्र, आता चर्चेत आलेल्या मायक्रोसॉफ्ट या जगातील सर्वात मोठ्या कंपनीचा मालक कोण आहे? आणि कंपनीची एकूण संपत्ती किती आहे? असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाले आहे. या दोन्ही प्रश्नाचे उत्तर या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेऊया…
संस्थात्मक गुंतवणूकदारांचा सर्वाधिक हिस्सा
दरम्यान, मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या शेअर्सची मालकी संस्थात्मक, किरकोळ आणि वैयक्तिक गुंतवणूकदारांमध्ये विभागली जाते. कंपनीतील संस्थात्मक गुंतवणूकदारांची हिस्सेदारी सुमारे ६९.१४ टक्के आहे. या संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंड आणि विमा कंपन्यांसारख्या मोठ्या संस्थांचा समावेश आहे. यातील सर्वात मोठा भागधारक ‘द व्हॅनगार्ड ग्रुप’ असून, त्याच्याकडे मायक्रोसॉफ्टचे सुमारे 9 टक्के शेअर्स आहेत.
किती आहे बिल गेट्स यांचा हिस्सा?
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सुमारे 7.73 टक्के शेअर्स कंपनीच्या इनसाइडर्सकडे आहेत. उर्वरित शेअर्स सामान्य लोक आणि वैयक्तिक गुंतवणूकदारांकडे आहेत. कंपनीच्या इनसाइडर्स व्यक्तींमध्ये कंपनी अधिकारी आणि बोर्ड सदस्यांचा समावेश होतो. कंपनीच्या एकूण समभागांपैकी सुमारे 7.73 टक्के हिस्सा इनसाइडर्स व्यक्तींकडे आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांचे या श्रेणीत सर्वाधिक शेअर्स आहेत. मे 2024 पर्यंत, नाडेला यांच्याकडे मायक्रोसॉफ्टचे 801,331 शेअर्स होते. तर कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांची कंपनीतील हिस्सेदारी सुमारे 2.79 टक्के आहे.
कंपनीची एकूण संपत्ती किती?
किरकोळ गुंतवणूकदार म्हणजेच सामान्य जनता असते. यामध्ये शेअर बाजारातील शेअर्स खरेदी आणि विक्री करणाऱ्या सर्व लोकांचा समावेश आहे. मायक्रोसॉफ्टच्या एकूण शेअर्सपैकी 23.13 टक्के शेअर्स सामान नागरिकांकडे आहेत. 18 जुलै 2024 पर्यंत, मायक्रोसॉफ्टचे मार्केट कॅप किंवा नेट वर्थ 3.30 ट्रिलियन डॉलर होते. दरम्यान, कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये एका वर्षात 30.18 टक्क्यांनी वाढ झाली आहे.