
शेतकऱ्यांसाठी मोफत वीज, ...अखेर जीआर निघाला; 'या' कालावधीत मिळणार मोफत वीज!
येत्या दोन महिन्यामध्ये राज्यात विधानसभा निवडणूक लागणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकार लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडत आहे. अशातच आता अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024′ लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडून अधिकृतरित्या जीआर काढण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
काय आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना
राज्यात सध्या सर्व शेतकऱ्यांना कृषी पंपांना रात्रीच्या वेळी 10/8 तास किंवा दिवसा 8 तास थ्री फेज वीज रोटेशन पद्धतीने उपलब्ध करून दिली जाते. या विजेच्या बिलाचा शेतकऱ्यांवरील भार कमी करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रातील एकूण 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांच्या 7.5 एचपी क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णतः मोफत वीज देण्याबाबत जीआर काढला आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारला यासाठी तब्बल 14 हजार 760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात महावितरणला द्यावे लागणार आहे.
…आता घराबाहेर गाडी काढताच, तुमच्या बँक खात्यातून टोल कापला जाणार; गडकरींची माहिती!
काय असेल या योजनेचा कालावधी?
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही योजना प्रामुख्याने पुढील पाच वर्षांसाठी राज्यभरात राबविली जाणार आहे. अर्थात एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. परंतु 3 वर्षांच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेऊन, पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील 7.5 एचपीपर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील. असेही सरकारने जीआरमध्ये म्हटले आहे.