घरांच्या विक्रीत मोठी घसरण, वाढत्या किंमतींमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला लागलाय ब्रेक!
स्वतःचे हक्काचे घर खरेदी करणे हे जवळपास सर्वांचेच स्वप्न असते. त्यादृष्टीने गेल्या काही वर्षांत घर खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. लोकांमध्ये मोठी आणि आलिशान घरे खरेदी करण्याची आवडही वाढली आहे. मात्र, याउलट जुलै-सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत मोठी घट नोंदवली गेली आहे. या कालावधीत देशातील 7 मोठ्या शहरांमध्ये 1.07 लाख घरांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा १.२ लाख इतका होता. घरांच्या विक्रीत सुमारे 11 टक्क्यांची घट झाली आहे. घराच्या वाढत्या किमती आणि पावसाळाच्या दिवसातील सुस्ती यामुळे ही घट झाल्याचे सांगितले जात आहे.
(फोटो सौजन्य – istock)
देशातील टॉप 7 शहरांमध्ये मोठी घसरण
रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीची संस्था असलेल्या एनरॉकच्या अहवालानुसार, भारतातील टॉप 7 शहरांमधील ही घसरण धक्कादायक आहे. दरवर्षी गणेशोत्सवात मुंबई परिसरात घरांची विक्री वाढते. मात्र, यावेळी परिस्थिती उलट असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या घरांच्या झपाट्याने वाढणाऱ्या किमतींमुळे खरेदीदार सावध झाल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. तो आपला घर खरेदीचा निर्णय काही काळ पुढे ढकलून, घरांच्या किंमती कमी होण्याची वाट पाहत असल्याचे सांगितले जात आहे.
हे देखील वाचा – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वाचा… काय आहे नेमकं प्रकरण!
सणासुदीच्या हंगामात घरांची विक्री वाढण्याची अपेक्षा
मात्र, ऑक्टोबरमधील सणासुदीच्या हंगामात रिअल इस्टेट क्षेत्रातील विकासकांना मोठ्या अपेक्षा आहेत. नवरात्री, दसरा आणि दिवाळीच्या काळात घरांच्या विक्रीत पुन्हा वाढ होऊ शकते, असे त्यांचे मत आहे. यानंतर ख्रिसमसपर्यंत घरांची विक्री आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सात शहरांमध्ये सुमारे 1.07 लाख घरांची विक्री
एनरॉकच्या अहवालानुसार, जुलै ते सप्टेंबर या कालावधीत केवळ मुंबई महानगर क्षेत्र, एनसीआर, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, पुणे आणि हैदराबाद या सात शहरांमध्ये सुमारे 1.07 लाख घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी 2023 मध्ये या तीन महिन्यांत हा आकडा 1.2 लाख घर विक्री इतका होता. एनरॉकचे चेअरमन अनुज पुरी यांच्या मते, गेल्या दोन वर्षांत घरांच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. त्यामुळे ही घरे सामान्य लोकांच्या बजेटपासून दूर होत आहेत. केवळ एका वर्षात घरांच्या किमतीत सुमारे २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2022 च्या तुलनेत हा आकडा जवळपास 37 टक्के इतका आहे. घरांच्या किंमती आता विक्रमी उच्चांकावर असल्याने गुंतवणूकदारही रिअल इस्टेट क्षेत्रापासून दूर जात आहेत.