रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर उतरणार कार मार्केटमध्ये; टाटा-महिंद्रा या कंपन्यांना देणार टक्कर!
अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स ग्रुपची भारतीय उद्योगविश्वात छाप आहे. आता रिलायन्स ही कंपनी हीच छाप कार मार्केटमध्ये उमटवणार आहे. अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील समूह कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने इलेक्ट्रिक कार आणि बॅटरी बनवण्याची योजना तयार केली आहे. यासाठी रिलायन्स इन्फ्रा कंपनीने चीनची लोकप्रिय इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी बीवायडीच्या माजी अधिकाऱ्यांना रिलायन्ससोबत जोडून घेतले आहे.
कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 2 टक्क्यांनी वाढ
एका नामांकित वृत्तसमुहाने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त देत म्हटले आहे की, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ईव्ही (इलेक्ट्रिक कार) योजनेवर गांभीर्याने विचार करत आहे. त्यांनी ईव्ही (इलेक्ट्रिक कार) प्लांटवरील खर्चासाठी संशोधन सुरू केले आहे. या प्लांटची वार्षिक उत्पादन क्षमता अडीच लाख वाहनांची असणार आहे. येत्या काही वर्षांत ही संख्या 7.50 लाख वाहनांपर्यंत वाढवली जाणार आहे. याशिवाय, कंपनीला 10 गिगावॅट तास (जीडब्लू) क्षमतेचा बॅटरी प्लांटही उभारायचा आहे. ज्याला पुढे 75 गिगावॅट तासांपर्यंत वाढवले जाईल. सध्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने या योजनेबाबत अधिकृतपणे पुढे येत काहीही सांगितलेले नाही. मात्र, हा अहवाल आल्यानंतर आज कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 2 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
या कंपन्याही सुरु लॉन्च इलेक्ट्रिक कार
उपलब्ध माहितीनुसार, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी आपल्या कार योजनेसाठी चीनसह अनेक ठिकाणी भागीदार शोधत आहे. यासाठी कंपनीने दोन उपकंपन्यांची नोंदणीही केली आहे. यापैकी एकाचे नाव रिलायन्स ईव्ही प्रायव्हेट लिमिटेड आहे. सध्याच्या घडीला टाटा मोटर्स ही या क्षेत्रातील 70 टक्के वाटा असलेली सर्वात मोठी ईव्ही उत्पादक कंपनी आहे. अलीकडेच महिंद्रा कंपनीने अनेक ईव्ही मॉडेल्सचे प्रदर्शन केले आहे. मारुती सुझुकी आणि ह्युंदाई देखील 2025 मध्ये आपले ईव्ही (इलेक्ट्रिक कार) मॉडेल लॉन्च करण्याची योजना आखत आहेत.
बीवायडीचे अधिकारी असणार प्रकल्प सल्लागार
विशेष म्हणजे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने अलीकडेच आपल्या ईव्ही (इलेक्ट्रिक कार) प्रकल्पासाठी बीवायडीचे माजी अधिकारी संजय गोपालकृष्णन यांचा समावेश केला आहे. ते या प्रकल्पाशी सल्लागार म्हणून जोडले गेले आहेत. दरम्य़ान, सध्या भारतात विकल्या जाणाऱ्या एकूण कारपैकी फक्त 2 टक्के कार ईव्ही कार आहेत. सरकार देशात 30 टक्क्यांपर्यंत ईव्ही (इलेक्ट्रिक कार) वाढवण्याचा विचार करत आहे. यासाठी सरकारने ईव्ही, बॅटरी आणि पार्ट्स निर्मितीसाठी ५ अब्ज डॉलर्सचा कार्यक्रम देखील सुरू केला आहे.