need-of-80-thousand-engineers-in-tcs-right-candidate-not-found
देशात एकीकडे बेरोजगार इंजिनियर्सची संख्या वाढलेली असताना, इंजिनियर्सना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टाटा कॅन्सल्टंसी सर्व्हिसेसमध्ये जवळपास ८० हजार पदे खाली आहेत. कंपनी देखील ही सर्व पदे भरण्यासाठी उत्सुक आहे. मात्र, गरज असूनही कंपनीची ही पदे भरली जात नसल्याचे समोर आले आहे.
त्यामागील कारण ऐकून तुम्हीही चकित झाल्याशिवाय राहणार नाही. टीसीएसने याबाबत म्हटले आहे की, संबंधित जागांसाठी इंजिनियर्समधील कौशल्याच्या अभावामुळे पात्र उमेदवार मिळत नाही. अर्थात कंपनी या पदांसाठी ज्या क्षमतेच्या युवकांना नोकरी देण्याचा विचार करत आहे. असे उमेदवार कंपनीला मिळत नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
प्रोजेक्टच्या गरजांनुसार उमेदवार मिळत नाहीये
टीसीएस एचआर विभागाचे ग्लोबल ऑपरेशन्स हेड अमर शेट्या यांनी नुकत्याच एका टाउन हॉलमध्ये खुलासा केला आहे की, सध्याच्या घडीला कंपनीला एकूण 80,000 इंजिनियर्सची आवश्यकता आहे. मात्र, संबंधित जागांसाठी प्रोजेक्टनुसार पात्र व्यक्तींअभावी ही पदे रिक्त पडलेली आहेत. कंपनी कंत्राटी पद्धतीने ही गरज भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, याबाबत टीसीएसकडून उघडपणे काहीही सांगितले जात नसल्याने, अधिक माहिती मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.
फ्रेशर्सची जॉइनिंग टाळली जातीये
देशातील आघाडीच्या मोठ्या आयटी कंपन्या सध्याच्या घडीला जवळपास १० हजार फ्रेशर्सना नोकरी देण्यास उशीर करत आहे. यामध्ये टीसीएसचा देखील समावेश आहे. या कंपन्यांनी फ्रेशर्सना अजूनही जॉइनिंगची तारीख दिलेली नाही. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, झेन्सार आणि एलटीआई माइंड ट्री या कंपन्यांमध्ये निवड झालेले विद्यार्थी याबाबत उघडपणे ओरड करत आहे. इन्फोसिसने फ्रेशर्सना जॉइनिंगबाबत ई-मेलद्वारे सूचित केले आहे की, त्यांची जॉइनिंग तारीख ही कंपनीच्या कामाच्या गरजेनुसार निश्चित केली जाईल. इन्फोसिसने वर्षभरापूर्वी सुमारे ५० हजार लोकांना नोकऱ्या दिल्या होत्या. पण, यावेळी त्यांनी कॅम्पस निवडीमधून केवळ 11,900 विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
टीसीएस, इन्फोसिस, विप्रोच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट
झेन्सार या आघाडीच्या कंपनीने एप्रिल महिन्यात कॅम्पस मुलाखतींमधून निवड झालेल्यांना रुजू होण्यापूर्वी चाचणी देण्याची मागणी केली होती. अर्थात याबाबत कंपन्यांचे म्हणणे आहे की, उत्तर अमेरिका आणि युरोपमधील ग्राहक आयटी खर्चाबाबत खूपच सतर्कता बाळगत आहेत. त्यामुळे आयटी क्षेत्र मंदीच्या गर्तेत आहे. त्याचा परिणाम कंपन्यांच्या तिमाही निकालांवरही दिसून येत आहे. मार्च तिमाहीअखेर टीसीएस, विप्रो आणि इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ६४ हजारांनी घटली आहे.