येत्या आठवड्यात खुला होणार 'हा' आयपीओ, पैसे तयार ठेवा, गुंतवणुकीची मोठी संधी!
येत्या आठवड्यात गुंतवणुकदारांना मोठी संधी असणार आहे. मुंबई येथील आयटी सोल्यूशन्स कंपनी ओरिअंट टेक्नॉलॉजिज लिमिटेड ही कंपनी येत्या बुधवारी अर्थात 21 ऑगस्ट 2024 रोजी आयपीओ लॉंच करणार आहे. विशेष म्हणजे 10 रूपये किंमत असलेल्या प्रत्येक शेअर्ससाठी कंपनीने 195 रुपये ते 206 रुपये इतका किंमत पट्टा निश्चित केला आहे. ओरिअंट कंपनीचा हा आयपीओ बुधवार अर्थात 21 ऑगस्ट 2024 रोजी खुला होणार असून, 23 ऑगस्ट रोजी बंद होणार आहे. गुंतवणुकदार किमान 72 शेअर्सच्या लॉटसाठी व त्यापुढे 72 च्या पटीत गुंतवणुक करू शकणार आहे.
किती असेल आयपीओचा आकार?
मुंबई येथील आयटी सोल्यूशन्स कंपनी ओरिअंट टेक्नॉलॉजिज लिमिटेडचा या आयपीओमध्ये 120 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स असणार आहे. तसेच प्रमोटर सेलिंग शेअर होल्डर यांच्या वतीने ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत 4,600,000 शेअर्स ऑफरमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. नवीन शेअर्समधून मिळणाऱ्या भांडवलापैकी 10.35 कोटी रुपये नवी मुंबई येथील कार्यालयाची जागा घेण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. तसेच 79.65 कोटी रुपये भांडवली खर्चासाठी व अन्य सामान्य कॉर्पोरेट हेतुंसाठी वापरण्यात येणार आहेत.
(फोटो सौजन्य – istock)
हेही वाचा – मार्क झुकेरबर्ग यांनी उभारला पत्नीचा भव्य पुतळा, …म्हणतायेत प्राचीन इतिहासाशी आहे संबंध!
कशी आहे कंपनीची आर्थिक परिस्थीती?
ओरिअंट टेक्नॉलॉजिज कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये 30 जून 2024 पर्यंतच्या माहितीनुसार 101.20 कोटींच्या ऑर्डर आहेत. कंपनीने 2024 च्या आर्थिक वर्षात 602.89 कोटी रुपये महसूल मिळवला आहे. आधीच्या वर्षात कंपनीने 535.10 कोटी रुपये महसूल मिळवला होता. महसूलातील ही वाढ प्रामुख्याने क्लाउड डेटा मॅनेजमेंट सेवा व आयटीईएस सेवांच्या महसूल वाढीमुळे झाली आहे. यामुळे कंपनीचा करोत्तर नफा (पीएटी) 2024 साली 8.22 टक्क्यांनी वाढून, 41.45 कोटींवर पोहोचला आहे. तर 2023 साली कंपनीचा हा नफा 38.30 कोटी रुपये इतका होता.
काय करते ही कंपनी?
ओरिअंट टेक्नॉलॉजिज लिमिटेड कंपनीची स्थापना 1997 साली करण्यात आली होती. तेव्हापासून कंपनीने व्यवसायांसाठी आवश्यक विविध शाखांसाठी लागणारी आयटी उत्पादने विकसित करण्याचे कौशल्य हस्तगत केले आहे. कंपनीच्या अशा उत्पादनांमध्ये आयटी इंफ्रास्ट्रक्चर प्रॉडक्ट्स अँड सोल्यूशन्स, आयटी एनॅबल्ड सर्व्हिसेस (आयटीईएस) आणि क्लाउड अँड डेटा मॅनेजमेंट सेवा यांचा समावेश आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)