आनंदाची बातमी... पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार, 'इतक्या' रुपयांनी कमी होणार दर!
सर्वसामान्य जनतेला सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या सध्या असलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. पण आता सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 2 ते 3 रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्या आहेत. त्यामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनांचे दर कमी करण्याची मागणी होत आहे. याच पार्श्वभुमीवर हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
प्रति लिटर 2 ते 3 रुपयांची कपात होण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे वाहनांच्या इंधनावरील पेट्रोलियम कंपन्यांच्या नफ्यात सुधारणा झाली आहे. यामुळे तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलचे दर लिटरमागे 2 ते 3 रुपयांनी कमी करण्यास वाव मिळाला असल्याचं रेटिंग एजन्सी इक्राने दिली आहे. इक्राने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 74 रुपये प्रति बॅरलपर्यंत खाली आल्या आहेत. या किमती मार्चमध्ये 83 – 84 डॉलर प्रति बॅरल इतक्या होत्या. जर कच्च्या तेलाच्या किमती कमी राहिल्या तर तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 2 ते 3 रुपयांनी कमी करू शकतात. या निर्णायामुळे सर्वसामान्य ग्राहकांना एक मोठा दिलासा मिळू शकतो.
लवकरच होणार दर कपातीचा निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, 5 ऑक्टोबरनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकांपूर्वी म्हणजेच ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणे शक्य असल्याचे बोलले जात आहे.
इक्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा समूह प्रमुख गिरीशकुमार कदम म्हणाले की, इक्राचा अंदाज आहे की 17 सप्टेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या किमतींच्या तुलनेत तेल वितरण कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर 15 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर 12 रुपये नफा होत होता. मार्च 2024 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणत्याही प्रकारची कपात करण्यात आलेली नाहीये. 15 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपये प्रति लिटरने कपात करण्यात आली होती.
गेल्या काही महिन्यांत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. कमकुवत जागतिक आर्थिक वृद्धीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची मागणी कमी झाली आहे. तर तेल उत्पादनात कमी करण्याचा निर्णय ओपेक प्लस देशांनी दोन महिन्यांनी पुढे ढकलला आहे.