EPF Rules Changes Proposal : PF मधून 90% रक्कम काढल्यास रिटायरमेंटला 27 लाखांचा फटका? नियमांमध्ये कोणत्या 2 मोठ्या बदलांचा प्रस्ताव

EPF Rules Changes Proposal : नोकरीदरम्यान किंवा गरजेच्या वेळी PF मधून मोठी रक्कम काढणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि सावध करणारा अहवाल समोर आला आहे. पीएफमधील ९० टक्के रक्कम काढल्यास निवृत्तीच्या वेळी सुमारे २७ लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते, तसेच पीएफ नियमांमध्ये २ मोठ्या बदलांचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
Photo - Social Media
EPF Rules Changes Proposal EPF Rules Changes Proposal
Published on: 
Updated on: 
  • PF मधून 90% रक्कम काढल्यास दणका

  • रिटायरमेंटला 27 लाखांचा बसणार फटका?

  • नियमांमध्ये कोणत्या 2 मोठ्या बदलांचा प्रस्ताव

EPF Rules Changes Proposal : नोकरीदरम्यान किंवा गरजेच्या वेळी PF मधून आपण पैसे काढतो पण ही रक्कम जर मोठी असेल तर त्याचा बराच मोठा फटका कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच EPFO ने PF मधून निधी काढण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. नेमका काय आहे हा बदल आणि कोणावर याचा कसा परिणाम होणार?

नवीन प्रस्तावानुसार, कर्मचारी आता त्यांच्या ईपीएफ खात्यातील शिल्लकीच्या ९० टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकतील. यापूर्वी ही मर्यादा ७५ टक्के होती. याचा अर्थ असा की, कर्मचारी आता गरजेनुसार अतिरिक्त १५ टक्के रक्कम काढू शकतील. पण, जास्त पैसे काढले तर सेवानिवृत्तीच्या वेळी महाग ठरू शकते. याचे कारण असे की, उर्वरित पीएफ रकमेवर मिळणारे व्याज दीर्घकाळात एक मोठा निधी तयार करते.

वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत २७ लाख रुपयांपर्यंतचे नुकसान

'द इकॉनॉमिक टाइम्स'च्या अहवालानुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याने वयाच्या ५० व्या वर्षी त्यांच्या पीएफ खात्यात जमा असलेल्या ९५ लाख रुपयांपैकी ७५% रक्कम काढली, तर त्यांना ७१.२५ लाख रुपये मिळतील. तर, ९०% रक्कम काढल्यास ८५.५० लाख रुपये मिळतील. याचा अर्थ असा की, ९०% रक्कम काढल्याने कर्मचाऱ्याला तात्काळ १४.२५ लाख रुपये अधिक मिळतील, परंतु वयाच्या ५८ व्या वर्षापर्यंत त्यांच्या सेवानिवृत्ती निधीत २६.८७ लाख रुपयांची घट होऊ शकते.

वयानुसार नेमकं किती नुकसान होण्याची शक्यता?

३० वर्षे: ५ लाख रुपयांच्या पीएफ शिल्लकीवर, ७५% रक्कम काढल्यास ३.७५ लाख रुपये आणि ९०% रक्कम काढल्यास ४.५० लाख रुपये मिळतील. वयाच्या ५८ व्या वर्षापर्यंत संभाव्य नुकसान ६.९० लाख रुपये आहे.

३५ वर्षे: १५ लाख रुपयांच्या शिल्लकीवर, ७५% रक्कम काढल्यास ११.२५ लाख रुपये आणि ९०% रक्कम काढल्यास १३.५० लाख रुपये मिळतील. संभाव्य नुकसान १३.९३ लाख रुपये आहे.

४० वर्षे: ३० लाख रुपयांच्या शिल्लकीवर, ७५% रक्कम काढल्यास २२.५० लाख रुपये आणि ९०% रक्कम काढल्यास २७ लाख रुपये मिळतील. संभाव्य नुकसान १८.७५ लाख रुपये आहे.

४५ वर्षे: ५५ लाख रुपयांच्या शिल्लकीवर, ७५% रक्कम काढल्यास ४१.२५ लाख रुपये मिळतील आणि ९०% रक्कम काढल्यास ४९.५० लाख रुपये मिळतील. संभाव्य नुकसान २३.१२ लाख रुपये आहे.

५० वर्षे: ९५ लाख रुपयांच्या शिल्लकीवर, ७५% रक्कम काढल्यास ७१.२५ लाख रुपये मिळतील आणि ९०% रक्कम काढल्यास ८५.५० लाख रुपये मिळतील. संभाव्य नुकसान २६.८७ लाख रुपये आहे.

नेमकं गणित काय आहे?

या गणनेमध्ये पीएफवर ८.२५% वार्षिक व्याजदर गृहीत धरला आहे. तसेच, कर्मचाऱ्याचा निधी वयाच्या ५८ वर्षांपर्यंत खात्यात गुंतवलेला राहील आणि व्याजदर संपूर्ण कालावधीत सारखाच राहील, असेही गृहीत धरले आहे.

EPFO ने नियमांमध्ये दोन मोठे बदल प्रस्तावित

१. पूर्वी, कर्मचाऱ्यांना वयाच्या ५५ ​​वर्षांपर्यंत त्यांच्या पीएफ खात्यात किमान २५% शिल्लक ठेवणे आवश्यक होते. आता, ही मर्यादा १०% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे ९०% पर्यंत रक्कम काढता येईल.

२. पूर्वी, नोकरी गेल्यास संपूर्ण पीएफ शिल्लक काढण्यासाठी १२ महिने थांबावे लागत होते. आता, हा कालावधी २ महिन्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.