Railways RAC Ticket Rules: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Railways RAC Ticket Rules: भारतीय रेल्वेतील 43 वर्षे जुनी RAC तिकीट व्यवस्था डिजिटल तिकीट तपासणीमुळे नकोशी झाली. त्यामुळे ती पूर्णपणे रद्द करण्यावर रेल्वे प्रशासनात विचार चालू आहे. संसदीय लोकलेखा समितीने पूर्ण बर्थ न मिळणाऱ्या प्रवाशांकडून पूर्ण भाडं घेण्यावर आक्षेप नोंदवला होता. पण अंशतः परतावा देण्याची प्रोसेस अवघड असल्याने ही प्रणालीच बंद करण्याचा पर्याय विचारात आहे. दुसरीकडे, दक्षिण पश्चिम रेल्वेने लग्न, तीर्थयात्रा आणि सहलीसाठी एकत्र प्रवास करणाऱ्या गटांना दिलासा देत मोठ्या गटांच्या आरक्षणावरील बर्थ संख्येची कमाल मर्यादा काढून टाकली. Railways RAC Ticket Rules:
भारतीय रेल्वेच्या तिकीट आणि प्रवास पद्धतीमध्ये मोठे फेरबदल होण्याची चिन्हं दिसतात. 1983-84 पासून सुरू असलेली तब्बल 43 वर्षे जुनी RAC म्हणजेच रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन प्रणाली संपवण्याबाबत रेल्वे प्रशासनात हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे, मोठ्या समूहाने प्रवास करणाऱ्यांसाठी दक्षिण पश्चिम रेल्वेने तिकीट आरक्षणावरील संख्येची मर्यादा काढून टाकत मोठी सूट दिली.
टाटा समूहात मोठ्या घडामोडी! TATA Son’sचा वाद सुरू असतानाच ट्रस्टचे 5 महत्त्वाचे निर्णय
सध्याच्या RAC पद्धतीनुसार एका बर्थवर दोघांना बसायची सोय दिली जाते. पण दोघांकडूनही पूर्ण तिकीट दर घेतला जातो. रेल्वेतल्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या मते, नव्या डिजिटल यंत्रणेमुळे या सोयीची आधीइतकी गरज राहिलेली नाही.
‘साईड-लोअर’ बर्थमध्ये स्लीपरसाठी 7, थर्ड एसीसाठी 4 आणि सेकंड एसीसाठी 3 जागा RAC साठी राखीव असतात. नव्या ‘वंदे भारत स्लीपर’ गाड्यांमध्ये मात्र ही सोय नाही.
तिकीट तपासणाऱ्यांकडे असलेल्या ‘हँड-हेल्ड टर्मिनल’मुळे कोणता प्रवासी ट्रेनमध्ये आलेला नाही, हे लगेच कळतं. अशा रिकाम्या जागा पुढच्या स्टेशनवरून करंट बुकिंगने उपलब्ध होऊ शकतात आणि तपासणीतल्या गडबडीला पण आळा बसतो.
2015 च्या रद्दीकरण नियमानुसार प्रवासी आला नाही तर मूळ तिकिटाचे पैसे जप्त होतात आणि तीच जागा पुढे दुसऱ्या प्रवाशाला पूर्ण दरात देऊन रेल्वेचा महसूल तसाच राहतो.
लोकलेखा समितीने 4 फेब्रुवारी 2016 रोजी लोकसभेत दिलेल्या अहवालात पूर्ण बर्थ न मिळणाऱ्या RAC प्रवाशांकडून पूर्ण भाडं घेण्यावर आक्षेप नोंदवला होता आणि थोडा परतावा देण्याचा पर्याय सुचवला होता. पण ई-तिकीट आणि खिडकीवरचं तिकीट अशा दोन्ही प्रकारात थोडा परतावा देण्याची टेक्निकल रचना करणं अवघड असल्याने, RAC पूर्णपणे बंद करणं जास्त सोपं ठरेल, असं मत रेल्वे वर्तुळात बोललं जातं.
मोठ्या गटांच्या प्रवासासाठी नियम सैललग्न, धार्मिक यात्रा, क्रीडा स्पर्धा तसेच शाळा-कॉलेजच्या आणि सांस्कृतिक सहलींसाठी एकत्र जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला. बल्क किंवा ग्रुप बुकिंगसाठी असलेल्या बर्थच्या कमाल मर्यादेचं बंधन आता सैल केलं.
नव्या नियमांनुसार, चीफ रिझर्व्हेशन सुपरवायझर्स आणि स्टेशन मॅनेजर्स ठरलेल्या मर्यादेशिवाय सगळ्या श्रेणींमध्ये गट आरक्षणाला मान्यता देऊ शकतील. अॅडव्हान्स रिझर्व्हेशन पिरियड सुरू होईल त्या दिवशी सकाळी 9 वाजल्यापासून याचे अर्ज करता येतील. यासाठी प्रवासाचं कारण सांगणं तसेच प्रत्येक प्रवाशाचं पूर्ण नाव, वय, लिंग आणि पत्ता देणं गरजेचं राहील. थोडक्यात, एकीकडे RAC बंद होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे ग्रुपने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.






