कधीकाळी करत होता 9000 रुपयांची नोकरी; आज आहे वार्षिक 16 कोटींच्या टर्नओव्हरचा व्यवसाय!
सध्याच्या घडीला व्यवसाय करण्याकडे तरुणांचा ओढा वाढला आहे. असे अनेक व्यवसाय आहेत. ज्यांना सुरू करण्यासाठी अधिकचे भांडवल किंवा जास्त शिक्षण लागत नाही. त्यासाठी समर्पण आणि मेहनतीची आवश्यकता असते. या दोन गोष्टींच्या मदतीने तुम्ही तुमचा व्यवसाय नव्या उंचीवर नेऊ शकतात. बी.टेक नापास असलेले संदीप जांगरा यांनी देखील असेच काहीसे केले आहे. एकेकाळी महिन्याला नऊ हजार रुपये कमावणारे संदीप आज करोडो रुपयांची उलाढाल असलेला व्यवसाय सांभाळत आहे. आज आपण त्यांच्या यशस्वी व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत…
ट्रायल म्हणून वाटला पिझ्झा
संदीप जांगरा हे गोहाना हरियाणा येथील रहिवासी आहेत. ते पिझ्झा गॅलेरियाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांचे देशभरात अनेक आऊटलेट्स आहेत. पिझ्झा व्यवसाय सुरू करणे हे त्यांच्यासाठी तितकेसे सोपे नव्हते. त्यांना या व्यवसायाचा अनुभव नव्हता. यासाठी त्यांनी आधी प्रशिक्षण घेतले आणि नंतर व्यवसाय सुरू केला. या कामात त्यांची आई आणि भावाची त्यांना खूप मदत झाली. त्यांनी गोहाना (हरियाणा) येथे पहिले आउटलेट उघडले. आउटलेट उघडण्यापूर्वी त्यांनी अनेक लोकांना ट्रायल म्हणून पिझ्झा दिला. त्यामुळे त्यांच्या ब्रँडचे चांगले मार्केटिंग झाले.
हे देखील वाचा – आनंदाची बातमी… पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार, ‘इतक्या’ रुपयांनी कमी होणार दर!
बी.टेकला प्रवेश, मात्र अनुत्तीर्ण
संदीप हरियाणातील गोहाना येथील रहिवासी आहे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी गोहानाजवळील एका महाविद्यालयात बी.टेकला प्रवेश घेतला. मात्र ते ती पदवी पूर्ण करू शकले नाही. ते अनेक पेपर्समध्ये नापास झाले. चार वर्षांनंतर, त्यांनी घरी खोटे सांगितले की, ते उत्तीर्ण झाले आणि नोकरी शोधत आहे. त्यांचा शालेय मित्र इशान चुगच्या मदतीने त्यांना गुरुग्राममध्ये नोकरी मिळाली. त्यावेळी त्यांचा पगार 9200 रुपये प्रति महिना होता.
सुरुवातीला वडिलांकडून झाला विरोध
याचदरम्यान, त्यांनी 2014 मध्ये मित्रांसोबत पहिल्यांदा पिझ्झा खाल्ला होता. त्यांना तो खूप आवडला. त्यांना नोकरी करण्यात कोणताही रस नव्हता. पगारही कमी होता. अशा स्थितीत ते घरी परतले. घरी आल्यानंतर त्यांनी सर्वांना हकीकत सांगितली. सुरुवातीला वडिलांकडून विरोध झाला, पण नंतर सर्व काही ठीक झाले. संदीपने व्यवसायाचा विचार केला. खूप विचार करून आणि इतरांच्या सल्ल्यानंतर त्यांनी पिझ्झा आउटलेट सुरू करण्याचा निर्णय घेतला. पिझ्झा आउटलेट नसल्याने गोहाना येथूनच त्यांनी सर्व काही सुरू करण्याचा निर्णय घेतला.
शेकडो लोकांना देतायेत रोजगार
आज पिझ्झा गॅलेरियामध्ये त्यांचे एकूण 80 पेक्षा जास्त आउटलेट आहेत. या आउटलेटमधून ते दररोज 20 हजारांहून अधिक पिझ्झाची विक्री करतात. पिझ्झा गॅलेरिया पिझ्झा, पास्ता, गार्लिक ब्रेड, सँडविच, फ्राईज, बर्गर, सॉफ्ट ड्रिंक्स इ. त्यांच्या पिझ्झाच्या किमती ६९ रुपयांपासून आणि कॉम्बो किमती ८९ रुपयांपासून सुरू होतात. संदीप आपल्या व्यवसायातून शेकडो लोकांना रोजगारही देत आहेत. संदीप आणि ईशान यांना शार्क टँक इंडियाच्या सीझन 3 मध्ये देखील दिसण्याची संधी मिळाली. मात्र, त्यांना निधी मिळाला नाही. गेल्या आर्थिक वर्षात 2023-24 मध्ये त्यांची उलाढाल 15 कोटी रुपये होती. यावर्षी 16 कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा त्यांचा अंदाज आहे.