जुनं घर विकायचंय, नाही लागणार एक रुपयाही टॅक्स; बस्स... एवढे एक काम करा!
तुम्हीही तुमचे जुने घर विकण्याचा विचार करताय का? तुम्हाला आपले जुने घर विक्री करायचे आहे. मात्र, त्यावर लागणारा टॅक्स पाहून तुमचा हिरमोड होतो आहे का? मग ही बातमी वाचाच… अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात घर विक्रीवरील कर 20 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली. तर घराच्या विक्रीवर मिळणारा इंडेक्सेशन बेनिफिटही रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे.
भरावा लागू शकतो पूर्वीपेक्षा अधिक टॅक्स?
त्यामुळे आता तुम्ही देखील २००१ किंवा त्यानंतर खरेदी केलेली एखादे घर विक्री करण्याचा विचार करत असाल तर घराच्या विक्रीवर मिळणारा इंडेक्सेशन बेनिफिट रद्द करण्यात आला आहे. इंडेक्सेशन बेनिफिट रद्द झाल्याने जुन्या घराच्या विक्रीदरम्यान तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक टॅक्स भरावा लागू शकतो. मात्र, आता तुम्ही जुने घर विक्री करण्याची योजना बनवलीच असेल तर त्यावर भरला जाणारा हा एलटीसीजी टॅक्स तुम्हाला वाचवायचा असेल. होय… तुम्हाला जुन्या घराच्या विक्रीवर एक रुपयादेखील टॅक्स भरायचा नसेल तर, तुम्ही म्हणाल हे कसे? तर तुम्हाला त्यासाठी एक काम करावे लागणार आहे.
जर एखाद्या व्यक्तीने आपले जुने घर किंवा मालमत्ता विकून मिळालेल्या नफ्याची रक्कम (भांडवली नफा) नवीन मालमत्तेत गुंतवणूक केली तर त्याला एलटीसीजीवर कर भरण्यापासून सूट दिली जाते. याचा अर्थ असा की जुने घर विकून तुम्ही त्या रकमेत नवीन मालमत्ता घेतल्यास, तुम्हाला एलटीसीजी कराचा एक रुपयाही भरावा लागणार नाही.
– संजय मल्होत्रा, महसूल सचिव.
मग कधी लागतो नेमका कर?
याशिवाय महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, अनेकजण आपले जुने घर विक्री करण्यासाठी कर लागेल म्हणून घाबरतात. मात्र, असे बिलकुल नाही. जेव्हा जुने घर विकून मिळालेला नफा, नवीन घर खरेदी करत पुन्हा गुंतवला जात नाही तेव्हाच एलटीसीजी कर लागू होतो. जर तुम्ही आपले जुने घर विकले आणि त्या बदल्यात मिळालेल्या पैशाच्या माध्यमातून नवीन घर खरेदी केले तर त्यावर कोणताही कर लागणार नाही. असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.