येस बँकेच्या शेअरमध्ये मोठी घसरण, यामागचे कारण काय? 5 दिवसांत 9 टक्क्यांनी ढेपाळला
येस बँकेसाठी मागील ५ दिवस चांगले राहिलेले नाहीत. या काळात खासगी बँकांच्या शेअर्सच्या किमती तब्बल ९ टक्क्यांहून अधिक घसरल्या आहेत. राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये (एनएसई) येस बँकेचा शेअर २१.५० रुपयांवरून १९.५० रुपयांवर खाली आला आहे. तज्ज्ञांच्या मते, येस बँकेच्या शेअर्समध्ये ही विक्री तिमाही निकालाच्या दबावामुळे दिसून येत आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीची कामगिरी फ्लॅट राहणार असल्याचे मानले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, बँकेच्या ठेवी फारशा चांगल्या नसल्यामुळे विकासदर मंदावण्याची शक्यता आहे.
येस बँकेची टार्गेट प्राइस किती?
“येस बँकेच्या शेअर्समध्ये काही सत्रांमध्ये विक्री होऊ शकते. जर तुमच्याकडे येस बँकेचे शेअर्स असतील. तर ते ठेवण्याचा होल्ड करण्याचा सल्ला दिला जातो. स्टॉपलॉस १६.९० रुपये आहे. येत्या काळात हा शेअर २३ रुपयांवरून २४.८० रुपयांपर्यंत जाऊ शकतो,” अशी प्रतिक्रिया स्पार्क कॅपिटलचे एव्हीपी चंद्रकांत यांनी दिली आहे.
बँकेची कामगिरी कशी होती?
पहिल्या तिमाहीत जाहीर झालेल्या निकालात कंपनीने, निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर ४६.४९ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे म्हटले आहे. येस बँकेला एप्रिल ते जून २०२४ या कालावधीत ५०२.४३ कोटी रुपयांचा नफा झाला होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ३४२.५२ कोटी रुपये होता. पहिल्या तिमाहीत येस बँकेचे उत्पन्न १७.५९ टक्क्यांनी वाढून ८९१८.१४ कोटी रुपये झाले आहे. जुलैमध्ये मूडीजने रेटिंग स्टेबलवरुन वाढवून पॉझिटिव्ह केले होते. त्याचवेळी इक्राने ए निगेटिव्ह वरून ए मध्ये बदलले होते.
येस बँकेबाबत थोडक्यात माहिती
येस बँक ही एक खाजगी क्षेत्रातील बँक आहे. या बँकेची स्थापना २००३ मध्ये झाली असून, तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. किरकोळ ग्राहक, MSME आणि कॉर्पोरेट ग्राहकांना ही बॅंक सेवा पुरवते. बँकेची स्थापना राणा कपूर आणि अशोक कपूर यांनी 2003 मध्ये केली होती. या बॅंकेचे नेटवर्क भारतातील 300 जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. या जिल्ह्यांमध्ये बॅंकेच्या 1,198 शाखा, 193 बीसीबीओ आणि 1,287 हून अधिक एटीएम यांचा समावेश आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)