संग्रहित फोटो
छत्रपती संभाजीनगर : माझ्यासोबत लग्न केले नाही तर तुझ्या आई-वडिलांना मारून टाकीन, अशी धमकी देत १८ वर्षीय तरुणीचे अॅम्ब्युलन्समधून अपहरण केले. तिला आळंदी येथील आर्य सेवा संस्थेत नेऊन रजिस्टरवर जबरदस्ती स्वाक्षऱ्या करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा प्रकार १६ ते १७ जूनदरम्यान घडला आहे. याप्रकरणी दत्ता दिनकर गायकवाड याच्याविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी शहरातील नामांकित महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेत आहे. काही वर्षांपासून ती सुट्टीत आईच्या गावी जात होती. तेथे तिची दत्ता गायकवाड याच्याशी ओळख झाली. पुढे तो तिच्याशी बोलू लागला. शहरातील नामांकित महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतल्यानंतर तो तेथे तिला भेटण्यासाठी येत होता. मैत्रिणीचा मोबाइल क्रमांक घेऊन तिच्याशी बोलणे, फिरायला नेणे आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न तो करीत होता. एकदा महाविद्यालयातून पीडितेला फुस लावून नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी तिच्या आईच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून दत्ता पसार होता.
विरोध केला, मात्र धमकीने घाबरली
१६ जून रोजी पीडिता झेरॉक्स काढण्यासाठी घराबाहेर पडली असता दत्ता अॅम्ब्युलन्स घेऊन आला. तुझ्याशी बोलायचे आहे, असे सांगून तिला अॅम्ब्युलन्समध्ये बसविले. जालना हायवेमार्गे रेल्वे स्टेशनवर नेले. तेथून दुसऱ्या अॅम्ब्युलन्समधून देवाची आळंदी, पिंपरी-चिंचवड येथे नेले. आळंदीला जाण्यास पीडितेने विरोध केला. मात्र, लग्नास नकार दिल्यास आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी दिल्याने ती घाबरली. आळंदी येथे दत्ताने तिला आर्य सेवा संस्थेत नेऊन रजिस्टरवर जबरदस्ती स्वाक्षऱ्या घेतल्या.
नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार
शिरूर शहरातील मार्वल इन लॉजिंग येथे नोकरीचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय तरुणीला कारमधून आणून तिच्यावर अंमली पदार्थाचा वापर करत सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिरूर शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एकाला अटक केली आहे. याबाबत पीडित तरुणी (वय २२ वर्ष) हिने शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दीपक श्रीमंदीलकर, अजय घेगडे, ऋषिकेश ढवळे, दीपक भोसले, सागर ढवळे, अनिकेत पठारे आणि एक अनोळखी व्यक्ती या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






