बोपदेव घाटात पुन्हा अपघात; ट्रक कठड्याला धडकला अन् नंतर...

बोपदेव घाटात पुन्हा ट्रकचा अपघात झाला आहे. ट्रक कठड्याला धडकल्याने तो दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.
bopdev ghat Accident
bopdev ghat Accident
Published on: 
Updated on: 
  • तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा ट्रकचा अपघात

  • बोपदेव घाटात अपघातांची मालिका सुरूच

  • प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा संताप

संभाजी महामुनी| सासवड : बोपदेव घाटाच्या पायथ्यालगत केजे कॉलेजसमोरील रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. या घटनेतून विद्यार्थी व पालक अद्याप सावरलेले नसतानाच याच घाटात पुन्हा ट्रकचा अपघात झाला आहे. ट्रक कठड्याला धडकल्याने तो दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, सलग अपघातांमुळे बोपदेव घाटातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

केजे कॅम्पसच्या ट्रिनिटी इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा पहिला पेपर सुटल्यानंतर ते घराकडे जाण्यासाठी कॉलेजसमोरील रस्त्यावर बसची वाट पाहत होते. त्याचवेळी सासवडकडून कोंढव्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसले. या अपघातात सिद्धेश राजे, विशाल दांगडे आणि मोहिनी चौधरी या तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. श्वेता तळेकर आणि सोहम घंगाळे हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेची चर्चा सुरू असतानाच बोपदेव घाटात पुन्हा एका ट्रकचा अपघात झाला. ट्रक घाटातील कठड्याला धडकल्याने तो दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावला. या घटनेमुळे घाटातील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

पोलीस, रस्ते वाहतूक विभाग सुस्त?

एकाच अपघातात तीन विद्यार्थ्यांचा बळी गेल्यानंतरही पोलीस प्रशासन, रस्ते वाहतूक विभाग आणि रस्ते बांधकाम विभागाकडून ठोस उपाययोजना झाल्या नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. घाटातील वाहतूक, वेगमर्यादा, सुरक्षा कठडे, सूचना फलक आणि बसथांब्याची व्यवस्था याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे कॉलेज प्रशासनाचे दुर्लक्ष

कॉलेजचा बसथांबा घाटाच्या तीव्र उतारालगत असल्याने दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी बसची वाट पाहतात. वाहनांची सोय असलेले विद्यार्थी तातडीने निघून जातात; मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसची प्रतीक्षा करावी लागते. उन्हाळा आणि पावसात विद्यार्थ्यांना रस्त्यालगत उभे राहावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित निवारा उभारण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

हॉटेलसमोरील जागेत बसथांबा करण्याची मागणी

केजे कॉलेजसमोरील हॉटेलजवळ मोठी मोकळी जागा उपलब्ध आहे. एसटी बस हॉटेलसमोरील जागेत थांबवल्यास विद्यार्थ्यांना थेट महामार्गालगत उभे राहण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने सुरक्षित बसथांबा निश्चित करावा, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे.

Q

बोपदेव घाटात पुन्हा काय घडले?

A

तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर याच घाटात पुन्हा एका ट्रकचा अपघात झाला. ट्रक कठड्याला धडकल्याने तो दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

Q

विद्यार्थ्यांचा अपघात कसा झाला होता?

A

केजे कॉलेजसमोरील रस्त्यावर विद्यार्थी बसची वाट पाहत असताना सासवडकडून कोंढव्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोच्या चालकाचे नियंत्रण सुटले. टेम्पो विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसल्याने सिद्धेश राजे, विशाल दांगडे आणि मोहिनी चौधरी या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

Q

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काय मागणी होत आहे?

A

कॉलेजसमोरील धोकादायक ठिकाणी सुरक्षित बसथांबा आणि विद्यार्थ्यांसाठी निवारा उभारण्याची मागणी होत आहे. तसेच घाटातील वेगमर्यादा, सुरक्षा कठडे, सूचना फलक आणि वाहतूक व्यवस्थेबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आहे.