

भटकी कुत्री मागे लागल्याने पळताना १८ वर्षीय हर्षल शिंदेचा हृदयविकाराने मृत्यू
कुत्र्यांपासून वाचण्यासाठी पळताना हर्षल बेपत्ता झाला आणि नंतर एका दुकानाजवळ मृतावस्थेत
भटक्या कुत्र्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने बदलापूरमधील नागरिकांमध्ये तीव्र संताप
ठाणे: महाराष्ट्रातील बहुतांश शहरांत भटक्या कुत्र्यांचा विषय अत्यंत गंभीर बनला आहे. मुंबई आणि उपनगरांत देखील नागरिकांना या कुत्र्यांच्या त्रासाला सामोरं जावं लागत असताना, आता बदलापुरातून एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. भटकी कुत्री मागे लागल्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी पळत सुटलेल्या १८ वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरातून तीव्र शोक व्यक्त होत असून प्रशासनाबाबत संतापाची भावना आहे.
बदलापूर गावात राहणारा हर्षल शिंदे (वय १८) हा बारावीत शिकत होता. आपल्या मित्राला भेटण्यासाठी आणि त्याला घरी सोडण्यासाठी तो बदलापूरच्या शनीनगर भागात गेला होता. शनीनगरात असतानाच काही भटकी कुत्री अचानक हर्षलच्या मागे लागली. कुत्री इजा करतील या भीतीने हर्षल आणि त्याचे मित्र-मैत्रिणी जीवाच्या आकांताने पळत सुटले.
कुत्र्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी सगळ्यांची पळापळ झाली. मात्र, काही अंतर धावल्यानंतर मित्रांना हर्षल कुठेच दिसत नव्हता. त्यामुळे घाबरलेले मित्र हर्षलला शोधू लागले. काही वेळ शोध घेतल्यानंतर तो एका दुकानाजवळ जमिनीवर पडलेला दिसला. त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पळतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
दरम्यान, अवघ्या १८ वर्षांच्या कोवळ्या तरुणाच्या या दुर्दैवी मृत्यूनंतर बदलापूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांमुळे वारंवार अपघाताच्या आणि हल्ल्यांच्या घटना घडून देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने बदलापूरमधील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बदलापूरमध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आणि वय काय आहे?
बदलापूर गावात राहणाऱ्या १८ वर्षीय हर्षल शिंदे या बारावीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
ही दुर्दैवी घटना नेमकी कशी आणि कोठे घडली?
बदलापूरच्या शनीनगर भागात मित्राला सोडण्यासाठी गेलेल्या हर्षलच्या मागे अचानक भटकी कुत्री लागली; स्वतःचा बचाव करण्यासाठी पळत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि एका दुकानाजवळ त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर नागरिकांमधून कोणती भावना व्यक्त होत आहे?
भटक्या कुत्र्यांमुळे अपघाताच्या घटना घडूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने बदलापूरमधील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.