संग्रहित फोटो
Pregnant Woman Abuse: विवाह सोहळा अगदी थाटामाटात पार पडला, पण लग्नाला काही महिने होत नाहीत तोच हुंड्याची हाव अन् अमानुष छळाची परिसीमा गाठल्याची अत्यंत भीषण घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आली आहे. चारचाकी वाहनासाठी माहेरून ५ लाख रुपये आणण्याचा तगादा, सोन्याच्या साखळीवरून टोमणे आणि अमानुष मारहाणीमुळे अवघ्या २५ वर्षीय विवाहितेला गर्भपात व ‘ब्रेन स्ट्रोक’ सारख्या जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागले आहे. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात शिक्षक असलेल्या पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगरजवळील सावंगी येथील एका लॉनमध्ये ५ एप्रिल २०२६ रोजी पीडित तरुणीचा विवाह नंदनवन कॉलनीतील सुमित अशोक मगरे (वय ३२, व्यवसाय शिक्षक, शिक्षण M.Sc., B.Ed.) याच्याशी झाला होता. दोन्ही बाजूंच्या संमतीने विवाह मोठ्या उत्साहात पार पडला, मात्र लग्नानंतर अवघ्या चार ते पाच दिवसांतच सासरच्या मंडळींनी आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली.
लग्नात मुलीच्या वडिलांनी नवरदेवाला सोन्याची साखळी (चैन) दिली नाही, यावरून सासू विजया मगरे, सासरे अशोक मगरे, नणंद अश्विनी बनसोडे आणि मोठा दीर प्रशांत मगरे यांनी विवाहितेला टोमणे मारत मानसिक त्रास देणे सुरू केले. मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून वडिलांनी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात जावयाच्या गळ्यात सोन्याची साखळी घातली, तरीही सासरच्यांची पैशांची भूक शमली नाही.
१४ जून २०२६ रोजी विवाहितेला शिवीगाळ करत “चारचाकी घेण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये घेऊन ये” अशी मागणी करण्यात आली. “दिलेली सोन्याची साखळी अपुरी आहे, पैसे आणले नाहीत तर सुमितचे दुसरे लग्न लावून देऊ,” अशी धमकी देत सासू, नणंद व दिराने पीडितेला बेदम मारहाण केली आणि तिचे केस पकडून जमिनीवर पाडले. एवढेच नव्हे तर तिचे वजन जास्त असल्याचे कारण पुढे करत तिच्याकडून फरशी पुसणे, झाडलोट आणि दगडावर कपडे धुणे अशी कष्टाची कामे जबरदस्तीने करून घेतली जात होती. तिला जाणीवपूर्वक अपुरे जेवण देऊन तिची उपासमार केली जात असल्याचेही फिर्यादीत उघड झाले आहे.
सततच्या मारहाणीमुळे आणि त्रासामुळे विवाहितेची प्रकृती कमालीची खालावली. ती गर्भवती राहिल्यानंतरही सासरच्यांनी तिला डॉक्टरांकडे नेण्यास वा सोनोग्राफी करण्यास जाणीवपूर्वक नकार दिला. या अमानुष त्रासामुळे २३ ऑगस्ट २०२६ रोजी तिचा दुर्दैवी गर्भपात झाला. प्रकृती अत्यंत बिघडल्याने तिला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणी केली असता तीव्र मानसिक व शारीरिक आघातामुळे तिला ‘ब्रेन स्ट्रोक’ आल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. वेळेत गर्भपात केला नसता तर तिच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला असता, असा अहवाल डॉक्टरांनी दिला.
या प्राणघातक घटनेनंतरही सासरच्या मंडळींनी तिला पुन्हा नांदवून घेण्यास ठाम नकार दिला अन् तिच्या माहेरच्यांनाही शिवीगाळ केली. अखेर पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून छावणी पोलिसांनी पती सुमित मगरे याच्यासह पाचही नातेवाइकांवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गंभीर गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Ans: ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील नंदनवन कॉलनी येथे घडली असून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: ५ लाखांचा हुंडा, सोन्याची साखळी यांसाठी अमानुष मारहाण करणे, उपासमार करणे आणि त्रासामुळे गर्भपात व ब्रेन स्ट्रोक होणे हे मुख्य आरोप आहेत.
Ans: पती सुमित मगरे, सासू विजया मगरे, सासरे अशोक मगरे, नणंद अश्विनी बनसोडे आणि दीर प्रशांत मगरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.






