काशिगाव पोलिसांची मोठी कारवाई; 50 हून अधिक गुन्ह्यांचा आरोपी अटक
Thane Crime News : काशिगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सराईत फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. दिपक इंद्रभूषण झा (वय ३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर राज्यासह इतर राज्यांमध्ये तब्बल ५० हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशिगाव पोलीस ठाण्यात ६ एप्रिल २०२६ रोजी गु.र.नं. १४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी दिपक झा याला त्याच्या डोंबिवली येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर १२ एप्रिल २०२६ रोजी अधिकृतपणे अटक करण्यात आली.
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली असून आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर ठाणे, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, रायगड तसेच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. विशेषतः फसवणूक (कलम ४२०), चोरी, कटकारस्थान, शस्त्र कायद्याचे उल्लंघन यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे.
नवघर, भांडुप, कोपरखैरणे, रबाळे, कासारवडवली, पायधुनी, पंचवटी, उल्हासनगर, भिवंडी, डोंबिवली यांसारख्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये आरोपीविरोधात अनेक गुन्हे नोंद आहेत. तसेच उत्तर प्रदेशातील जियनपुर पोलीस ठाण्यातही त्याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून काही प्रकरणांमध्ये आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. पोलीसांच्या मते, आरोपी विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची फसवणूक करत असे. त्याची कार्यपद्धती, त्यामागील नेटवर्क आणि इतर साथीदारांचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू आहे. या कारवाईमुळे मोठ्या फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना सावध राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.






