सौजन्य फोटो - सौशल मिडीया
मिळालेल्या माहितीनुसार, शेती करून कुटुंबाचा गाडा चालवणारे मुकेश कुमार यांना १९ ऑक्टोबर रोजी अचानक तीव्र ताप आला. प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना स्थानिक रुग्णालयात नेले; मात्र स्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आग्रा येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे तपासणीदरम्यान त्यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पती लवकरच ठणठणीत बरे होऊन घरी येतील, या आशेवर कुटुंबीय होते; पण परिस्थिती वेगळेच वळण घेत होती.
मुकेश यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची पत्नी दीपा यांनाही तापाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांनाही आग्रा येथील दुसऱ्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोघेही वेगवेगळ्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते. बुधवारी रात्री उपचारादरम्यान मुकेश कुमार यांची प्राणज्योत मालवली. पतीच्या निधनाची दुःखद वार्ता कानावर पडताच रुग्णालयात दाखल असलेल्या दीपा यांची प्रकृती अत्यंत खालावली. पतीच्या विरहाचा धक्का सहन न झाल्याने अवघ्या चार तासांत दीपा यांनीही या जगाचा निरोप घेतला.
गुरुवारी सायंकाळी जेव्हा पती-पत्नीचे मृतदेह कसद गावात पोहोचले, तेव्हा संपूर्ण गावाने टाहो फोडला. नातेवाइकांनी व ग्रामस्थांनी अत्यंत जड अंतःकरणाने एकाच चितेवर या दुर्दैवी दांपत्यावर अंतिम संस्कार केले. एकाच रात्री आई आणि वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या चार चिमुकल्यांकडे पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.






