सौजन्य फोटो - AI Gemini
नालासोपारा : नालासोपारा येथे एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आरिफ अबू शेख याच्यासह त्याची आई रुक्शाना आणि नातेवाईक साहिल खान यांच्याविरुद्ध नालासोपारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीने अशाच प्रकारे अनेक तरुणींना फसवल्याचा दावा तक्रारीत करण्यात आल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.
पोलिसांकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, पीडित तरुणीची आरोपी आरिफ अबू शेख याच्याशी व्यायामशाळेत ओळख झाली. त्यानंतर आरोपीने तिच्याशी जवळीक वाढवत प्रेमाचे आमिष दाखवले. पुढे लग्न करण्याचे आश्वासन देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने तक्रारीत केला आहे. आरोपीने वेगवेगळी आमिषे दाखवून आपली फसवणूक केल्याचेही पीडितेने म्हटले आहे.
हेही वाचा: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरातील व्यावसायिकाच्या मृत्यूला नवे वळण; शरीराच्या मागील बाजूस ९० टक्के जखमा
दरम्यान, आरोपीने तब्बल ७० ते ८० हिंदू तरुणींना वेगवेगळी आमिषे दाखवून फसवले आणि त्यांच्यासोबत गैरप्रकार केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच काही तरुणींचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून त्यांचा गैरवापर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यांची सत्यता अद्याप तपासातून स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे पोलिस तपासात या आरोपांना कितपत पुष्टी मिळते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर नालासोपारा पोलिसांनी आरिफ अबू शेख, त्याची आई रुक्शाना आणि नातेवाईक साहिल खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित कलमांनुसार कारवाई केली आहे.
हेही वाचा: Pune Crime News: वाद दोन जणांचा, बळी तिसऱ्याचा; तीन लाखांच्या वादात तरुणाचा रक्तरंजित अंत
पीडित तरुणी हिंदू आणि आरोपी मुस्लिम असल्याने या प्रकरणावरून काही हिंदुत्ववादी संघटनांकडूनही विविध आरोप करण्यात येत आहेत. मात्र, या आरोपांबाबत पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून तक्रारीतील आरोप, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि कथित फोटो-व्हिडिओ याबाबत तपास केला जात आहे.






