संग्रहित फोटो
पुणे : दोन जणांच्या पैशांच्या वादात मध्यस्थी करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. मित्राने घेतलेल्या तीन लाख रुपयांच्या उसने पैशांवरून सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा तीक्ष्ण शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. पाषाण परिसरातील आयटीआय मैदानाच्या प्रवेशद्वारासमोर रविवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली. सहदेव रामप्रकाश शर्मा (वय ३३, रा. सूस गाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहदेवचा मित्र ज्ञानेश्वर भोई याने बंटी नावाच्या व्यक्तीकडून तीन लाख रुपये उसने घेतले होते. हे पैसे परत करण्यावरून ज्ञानेश्वर आणि बंटी यांच्यात वाद सुरू होता. सहदेव या व्यवहारात मध्यस्थी करत होता. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सहदेव आणि त्याचा मित्र ओंकार डोईफोडे आयटीआय मैदानाच्या परिसरात गेले होते. याचवेळी आरोपी तेथे आले. पैशांच्या व्यवहारात मध्यस्थी करण्यावरून तसेच आरोपीच्या कुटुंबीयांबद्दल सहदेवने अपशब्द वापरल्याच्या गैरसमजातून वाद आणखी चिघळला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी सहदेवला मारहाण करण्यास सुरुवात केली. सहदेवने प्रतिकार केल्यानंतर आरोपींनी तीक्ष्ण शस्त्राने त्याच्यावर वार करून त्याला भोसकले. गंभीर जखमी झाल्याने सहदेव रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला. धक्कादायक बाब म्हणजे, गंभीर जखमी झाल्यानंतरही आरोपींनी सहदेवला ओढत फुटपाथवर नेले. त्यानंतर तेथेही त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
जखमी अवस्थेत सहदेवला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पाषाण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सहदेवचा भाऊ कृष्णा रामप्रकाश शर्मा (वय ३६, रा. सूस गाव) यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार बंटी उर्फ आशिष चक्रनारायण याच्यासह तिघांविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.






