सोशल मिडीया - सौजन्य फोटो
लखनऊ : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरात संशयास्पद अवस्थेत व्यावसायिकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडालेल्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. शिवा शर्मा यांच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या शरीराच्या मागील बाजूस सुमारे ९० टक्के जखमा असल्याचे समोर आले आहे. या जखमांच्या स्वरूपावरून मृत्यूपूर्वी त्यांना फरफटत नेण्यात आले असावे, असा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून या अहवालाबाबत तज्ज्ञांचे मत घेतले जात असून, त्यानंतर मृत्यूची परिस्थिती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
अलीगंजच्या कपूरथला येथील सेक्टर एफ परिसरात रंजना शर्मा यांचा व्यावसायिक मुलगा शिवा शर्मा हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर श्रद्धा दुबे हिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता श्रद्धाच्या घरातून शिवा खाली पडल्याचे दिसून आले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शिवाची आई रंजना शर्मा यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, शिवाच्या अंगावर केवळ अंडरवेअर होते. त्याच्या जबड्यातून आणि नाकातून रक्तस्राव होत होता. तसेच पाय वाकलेल्या अवस्थेत होते. शरीरावर विविध जखमा आणि सिगारेटचे चटके दिल्याच्या खुणा असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
आता समोर आलेल्या पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये शरीराच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या जखमांचे स्वरूप पाहता शिवाला मृत्यूपूर्वी फरफटत नेण्यात आले असावे, असा तज्ज्ञांचा प्राथमिक अंदाज आहे. या निष्कर्षानंतर पोलिसांकडून पोस्टमोर्टम अहवालाचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. मृत्यू नेमका कशा परिस्थितीत झाला, याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. तपासाचा भाग म्हणून क्राइम सीन रिक्रिएशन करण्याचाही पोलिसांचा विचार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा: Pune Crime News: वाद दोन जणांचा, बळी तिसऱ्याचा; तीन लाखांच्या वादात तरुणाचा रक्तरंजित अंत
पोलिसांच्या तपासानुसार, श्रद्धा दुबे हिचा २०२२ मध्ये पतीपासून घटस्फोट झाला होता. तिचा मुलगा सध्या तिच्या माजी पतीसोबत राहत असल्याची माहिती आहे. श्रद्धाचे महत्त्वाकांक्षी व्यक्तिमत्त्व आणि प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध यामुळे तिचा माजी पती तिच्याशी बोलण्यासही घाबरत असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये श्रद्धा, तिचा ड्रायव्हर, बहीण आणि अन्य काही व्यक्ती दिसून आल्याची माहिती आहे. शिवाला रुग्णालयात नेण्यात आले, त्यावेळी श्रद्धा तेथे उपस्थित असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, शिवा शर्माकडून एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि त्याला त्याचा विरोध केल्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवाने १२ ऑगस्ट २०२५ रोजी ऋषभ आणि त्याच्या दहा साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. श्रद्धा दुबे हिला यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले असून ती मॉडेलिंग शोमध्येही सहभागी होत असल्याची माहिती आहे. शिवा शर्मा यांच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती काय होती, घरातून पडण्याची घटना कशी घडली आणि शरीरावर एवढ्या मोठ्या प्रमाणात जखमा कशा झाल्या, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.






