संग्रहित फोटो
नवी मुंबई : ड्रिंक अँड ड्राइव्हची कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकाकडे पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप सीबीडी बेलापूर वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) रमेश पवार यांच्यावर करण्यात आला आहे. या कथित प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. प्राथमिक चौकशीनंतर रमेश पवार यांना निलंबित करण्यात आलं असून, पुढील तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सीबीडी बेलापूर येथील सिडको कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर वाहतूक पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात कारवाई करण्यासाठी ही मोहीम राबवली जात होती. यावेळी एक कारचालक मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत आढळल्याचं सांगण्यात येत आहे. नियमानुसार संबंधित चालकावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई होणं अपेक्षित होतं. मात्र, ही कारवाई टाळण्यासाठी एएसआय रमेश पवार यांनी चालकाकडे पाच हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. या कथित प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर प्रकरण चर्चेत आलं.
या घटनेची दखल घेत वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक चौकशीत गंभीर स्वरूपाची कसूर आढळल्याने रमेश पवार यांना पुढील आदेश मिळेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खारघर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. चौकशीतून या कथित प्रकाराबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
या कारवाईबाबत बोलताना डॉ. राहुल खाडे यांनी सांगितलं की, संबंधित कर्मचाऱ्याबाबतची माहिती समोर आल्यानंतर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली. भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का लागू नये, हा या कारवाईमागील उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीचे नियम लागू करण्यासाठी जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्याविरोधात लाच मागितल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. पुढील चौकशीत नेमकी काय माहिती समोर येते, याकडे लक्ष लागलं आहे.
Ans: ड्रिंक अँड ड्राइव्हची कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकाकडे पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं.
Ans: वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक चौकशीनंतर संबंधित एएसआयला निलंबित करण्यात आलं.
Ans: ही घटना नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील सिडको कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घडल्याची माहिती आहे.






