नवराष्ट्र टीम
झोपेत असताना बॅग लंपास
एक महिला प्रवासी इंदोर-पुणे एक्सप्रेसने प्रवास करत होती. वसई आणि भिवंडी दरम्यान तिला झोप लागली. काही वेळाने झोपेतून उठल्यानंतर तिची बॅग गायब असल्याचे तिच्या लक्षात आले. बॅगेमध्ये लॅपटॉप, आयफोन, महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर साहित्य होते.बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने डोंबिवली जीआरपी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
ATMमधून 80 हजार काढल्याचे उघड
तपास सुरू असताना पोलिसांना महिलेच्या चोरीला गेलेल्या एटीएम कार्डचा वापर झाल्याची माहिती मिळाली. या कार्डच्या माध्यमातून तब्बल 80 हजार रुपये काढण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी पैसे ज्या एटीएममधून काढण्यात आले, त्याची माहिती मिळवून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. एटीएम व्यवहार आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मुकेश कांतीलाल पुरोहित आणि मुकेश राज पुरोहित यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांचा चोरीच्या घटनेशी संबंध असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोबाईल साहित्य खरेदीसाठी मुंबईत आले होते
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी गुजरातमधील एका मोबाईल दुकानात काम करतात. मोबाईलशी संबंधित साहित्य खरेदी करण्यासाठी ते मुंबईला आले होते. परतीच्या प्रवासात इंदोर-पुणे एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये त्यांनी महिलेची बॅग चोरी केल्याचा आरोप आहे. बॅग चोरी केल्यानंतर त्यातील एटीएम कार्डचा वापर करून 80 हजार रुपये काढण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू
डोंबिवली जीआरपी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपींसोबत असलेल्या आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून, चोरीची बॅग, त्यातील साहित्य आणि एटीएममधून काढलेल्या पैशांबाबत पोलीस अधिक तपास करत असून डोंबिवली जीआरपी पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






