नवे कपडे घालून लग्नाला निघाले, पण वाटेतच काळाने गाठलं! खराडीच्या रिव्हरडेल चौकात भयंकर अपघात

नवे कपडे घालून लग्नाला निघालेल्या जोडप्यावर वाटेतच काळाचा घाला! खराडीच्या रिव्हरडेल चौकात भरधाव कारच्या धडकेत पत्नीचा मृत्यू, पती जखमी अन् चालक फरार...
Pune Accident
सौजन्य फोटो - सोशल मिडीया Pune Accident
Published on: 
Updated on: 
  • कारच्या धडकेत रोहिणी भालेराव यांचा मृत्यू, पती जखमी

  • लग्नासाठी दुचाकीवरून कुंजीरवाडीकडे जाताना घडली घटना

  • पळून गेलेल्या चालक दत्ता सूर्यवंशीवर गुन्हा दाखल

पुणे: नातेवाइकाच्या लग्नसमारंभासाठी आनंदाने तयार होऊन नवे कपडे घालून निघालेल्या जोडप्यासोबत वाटेतच भयंकर घडलं. लग्नासाठी दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्याच्या प्रवासाचा शेवट अत्यंत हृदयद्रावक ठरला. भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत सहप्रवासी महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला, तर पती जखमी झाले. अपघातानंतर मोटारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

नेमका काय घडला प्रकार?

२२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी खराडीतील खराडकर पार्क परिसरात, मुंढवा रेल्वे उड्डाणपुलाजवळील रिव्हरडेल चौकात हा अपघात घडला. येरवड्यातील पंचशीलनगर येथे राहणारे भगवान तुकाराम भालेराव (वय ६०) हे पत्नी रोहिणी भगवान भालेराव (वय ५०) यांच्यासह दुचाकीवरून कुंजीरवाडी येथे निघाले होते. हे जोडपं एका लग्नसमारंभासाठी दुचाकीनं निघालं होतं. मात्र, लग्नाचा आनंद अशा भयंकर दुर्घटनेत बदलेल, याची त्यांना कल्पनाही नव्हती. रिव्हरडेल चौकात भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धक्कादायक बाब म्हणजे, या अपघातानंतर जखमींची मदत करण्याऐवजी मोटारचालक तिथून फरारी झाला.

उपचारांदरम्यान पत्नीचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

या धडकेत भगवान भालेराव आणि त्यांच्या पत्नी रोहिणी भालेराव जखमी झाले. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान रोहिणी यांचे निधन झाले. अपघातानंतर पळून गेलेल्या मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ता धोंडिबा सूर्यवंशी (वय २५, रा. काळूबाईनगर, वाघोली, मूळ रा. नांदेड) असे संबंधित चालकाचे नाव असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Q

हा अपघात कोठे आणि केव्हा घडला?

A

२२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी खराडीतील खराडकर पार्क परिसरात, मुंढवा रेल्वे उड्डाणपुलाजवळील रिव्हरडेल चौकात हा अपघात घडला.