कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा
कराड : कराडजवळ शनिवारी पहाटे घडलेल्या धक्कादायक घटनेत कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्सप्रेसला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सिग्नल यंत्रणेत मुद्दाम अडथळा निर्माण करून रेल्वे थांबवण्याची धाडसी पद्धत वापरत चोरट्यांनी काही मिनिटांतच प्रवाशांना लुटून पलायन केले.
याबाबतची माहिती अशी की, शुक्रवारी रात्री कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेली सह्याद्री एक्सप्रेस नियोजित वेळेनुसार पुढे जात असताना शनिवारी पहाटे सुमारे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास सातारा-सांगली सीमेवरील कराड तालुक्यातील शेणोली स्थानकाजवळ पोहोचली. याच दरम्यान, रेल्वे येण्यापूर्वीच काही अज्ञात व्यक्तींनी सिग्नलवर कापड टाकून तो निष्क्रिय केला. परिणामी, चालकाला सिग्नल न मिळाल्याने गाडी थांबवावी लागली.
गाडी थांबताच चार ते पाच चोरटे तत्काळ सक्रिय झाले. त्यांनी डब्यांच्या दरवाजे आणि खिडक्यांजवळ उभ्या असलेल्या प्रवाशांना लक्ष्य करत त्यांच्या अंगावरील दागिने, तसेच हातातील मौल्यवान वस्तू जबरदस्तीने हिसकावून घेतल्या. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अनेक प्रवासी घाबरून गेले; काहींना प्रतिकार करण्याची संधीही मिळाली नाही.
धक्कादायक ! जन्मदात्या आईनेच केली मुलाची हत्या; अनैतिक संबंधास आड येत असल्याने काढला काटा
दरम्यान, सिग्नलमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळताच शेणोली व भवानीनगर स्थानकांवरील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सिग्नलवरील अडथळा दूर करून रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात आली. त्यानंतर सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा मार्गस्थ झाली. गाडी सुमारे पावणे तीनच्या सुमारास कराड स्थानकात दाखल होताच प्रवाशांनी रेल्वे पोलिसांकडे घडलेला प्रकार सांगितला. यानंतर सातारा रेल्वे पोलिस व मिरज लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. घटनास्थळी पाहणी करून पुरावे गोळा करण्यात आले.
चोरट्यांचा माग काढण्यासाठी पुणे, सोलापूर आणि मिरज येथून श्वान पथकेही बोलावण्यात आली. मात्र, मोठ्या प्रयत्नांनंतरही आरोपींचा ठावठिकाणा लागू शकलेला नाही. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, लोहमार्ग पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
. सिग्नलमध्ये मुद्दाम अडथळा निर्माण करून रेल्वे थांबवली.
. पहाटेच्या वेळेचा फायदा घेत प्रवाशांना केले लक्ष्य.
. काही मिनिटांतच दरोडा टाकून चोरटे पसार.
. पोलिसांकडून श्वान पथकांसह व्यापक तपास सुरू.






