संग्रहित फोटो
ठाणे : शहरातील कासारवडवली परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची त्याच्याच दोन मित्रांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रज्योत कांबळे असे मृत मुलाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून तो संशयास्पदरीत्या बेपत्ता होता. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेऊनही काही माहिती न मिळाल्याने कासारवडवली पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या तपासात त्याचा मृतदेह एका पोलीस चौकीच्या शेजारी जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळून आला.
प्रज्योत काही दिवसांपासून अचानक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर कासारवडवली पोलिसांनी तांत्रिक आणि गोपनीय पद्धतीने तपास सुरू केला. गुरुवारी रात्री तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार एका पोलीस चौकीच्या अगदी शेजारी जमिनीत पुरलेला प्रज्योतचा मृतदेह पोलिसांना आढळला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहावर जाळण्याचा प्रयत्न करून तो जमिनीत पुरल्याचे समोर आले आहे. पोलीस चौकीच्या अगदी शेजारीच मृतदेह पुरण्यात आल्याने या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्येमागे मित्रांमधील आपापसातील वाद असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हत्येत झाल्याचा पोलिसांना संशय आहे. प्रज्योतच्या दोन मित्रांनी मिळून त्याची हत्या केल्याचे तपासातून समोर आले आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कासारवडवली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या प्रकरणातील दोन संशयितांपैकी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दुसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके काम करत आहेत. हत्येमागे मित्रांमधील वादाव्यतिरिक्त आणखी काही कारण होते का, तसेच या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
Ans: प्रज्योतच्या दोन मित्रांनी मिळून हत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे.
Ans: मित्रांमधील किरकोळ वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक संशय असून, हत्येमागे आणखी काही कारण आहे का, याचा तपास सुरू आहे.






