Adinath Kothare Upcoming Movies: आदिनाथ कोठारेची बॉलिवूडमध्ये मोठी झेप! ‘रामायण’सह दोन बिग बजेट चित्रपटांत झळकणार

Adinath Kothare Upcoming Movies: राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आदिनाथ कोठारे ‘रामायण’ आणि ‘नयी नवेली’ या दोन मोठ्या बॉलिवूड चित्रपटांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. जाणून घ्या त्याच्या आगामी चित्रपटांविषयी.
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Published on: 
Updated on: 

Adinath Kothare Upcoming Movies:  राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आदिनाथ कोठारे आता बॉलिवूडमध्ये मोठी झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. मराठी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटवल्यानंतर आदिनाथ आता दोन मोठ्या हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन वेगवेगळ्या शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शकांनी केले आहे. त्यामुळे आदिनाथच्या आगामी बॉलिवूड प्रवासाकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

‘रामायण’ आणि ‘नयी नवेली’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका

आदिनाथ कोठारे हा नितेश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतीक्षित ‘रामायण’ या भव्य चित्रपटात दिसणार आहे. ‘दंगल’सारखा गाजलेला चित्रपट देणाऱ्या नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी आदिनाथला मिळाली आहे. हा चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दुसरीकडे, बालाजी मोहन दिग्दर्शित ‘नयी नवेली’ या चित्रपटातही आदिनाथ महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. वेगळ्या संकल्पनेवर आधारित असलेल्या या चित्रपटातून तो प्रेक्षकांसमोर एका नव्या अंदाजात येणार आहे. हा चित्रपट १६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दोन वेगळ्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा अनुभव

नितेश तिवारी आणि बालाजी मोहन या दोन्ही दिग्दर्शकांची काम करण्याची शैली वेगळी आहे. त्यामुळे या दोन चित्रपटांमधील अनुभव आदिनाथसाठी खास ठरला आहे. याबद्दल बोलताना आदिनाथने दोन्ही दिग्दर्शकांच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक केले.

“बालाजी मोहन आणि नितेश तिवारी या दोन दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम करणं हा माझ्यासाठी एका मोठ्या मास्टरक्लाससारखा अनुभव होता. बालाजी सर फँटसी, कॉमेडी, अ‍ॅक्शन आणि मोठ्या कलाकारांच्या फळीला अत्यंत शांतपणे आणि सहजतेने एका सूत्रात बांधतात. सेटवरचा त्यांचा संयम थक्क करणारा असतो.

तर दुसरीकडे, नितेश सरांचं व्हिजन अथांग आणि भव्य आहे. महाकाय कॅनव्हासवर काम करतानाही ते भावनिक बारकावे आणि अचूक नियोजन कधीही सुटू देत नाहीत. एवढ्या मोठ्या स्केलचा चित्रपट साकारताना स्वतःची दृष्टी पूर्णपणे स्पष्ट ठेवणं आणि कलाकाराला विश्वास देणं, ही या दोन्ही दिग्दर्शकांची सर्वात मोठी ताकद आहे,” असं आदिनाथ कोठारेने सांगितलं.

राष्ट्रीय पुरस्कारापासून बॉलिवूडच्या मोठ्या प्रोजेक्ट्सपर्यंतचा प्रवास

राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या आदिनाथ कोठारेने मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ‘रामायण’ आणि ‘नयी नवेली’सारख्या मोठ्या हिंदी चित्रपटांमधील त्याच्या भूमिका त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरू शकतात.

दोन वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांतून आदिनाथची अभिनयातील विविधता पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.