

लोकप्रिय टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. अर्जुनचा पत्नी नेहा स्वामीसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हे जोडपे पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे लग्नाच्या तब्बल १३ वर्षांनंतर अर्जुन आणि नेहा पुन्हा एकदा सात फेरे घेणार आहेत. त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर समोर आल्यानंतर चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.
अर्जुन बिजलानी आणि नेहा स्वामी यांनी नुकतीच त्यांच्या लग्नाची पत्रिका घेऊन गुरुद्वाराला भेट दिली. यावेळी त्यांनी नव्या सुरुवातीसाठी आशीर्वाद घेतले आणि नतमस्तक झाले. या भेटीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये अर्जुन आणि नेहा पारंपरिक वेशभूषेत दिसत असून, दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. हातात लग्नाची पत्रिका घेऊन त्यांनी पापाराझींसाठी पोजही दिल्या. यावेळी अर्जुनने पापाराझींना, "लग्नाला नक्की या", असे आमंत्रणही दिले.
व्हायरल झालेल्या लग्नपत्रिकेनुसार, अर्जुन आणि नेहा १२ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत. विशेष म्हणजे या पत्रिकेवर 'सामूहिक विवाह' असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या खास सोहळ्यात त्यांच्यासोबत इतर जोडपीदेखील विवाहबंधनात अडकणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, अर्जुन बिजलानी आणि नेहा स्वामी यांचे लग्न मे २०१३ मध्ये झाले होते. दोघांची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली. त्यानंतर जवळपास आठ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या जोडप्याला अयान नावाचा मुलगाही आहे. आता लग्नाच्या १३ वर्षांनंतर पुन्हा एकदा लग्न करण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, अर्जुन आणि नेहा 'पती पत्नी और पंगा २' या शोमध्ये सहभागी झाले आहेत. या शोमध्ये त्यांच्यासोबत दिव्यांका त्रिपाठी-विवेक दहिया, राहुल वैद्य-दिशा परमार, मनोज तिवारी-सुरभी तिवारी आणि दीपिका सिंग-रोहित राज गोयल यांसारख्या सेलिब्रिटी जोड्याही पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या शोच्या सेटवर अर्जुन आणि नेहा पुन्हा एकदा लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे.