Bandhu Marathi Movie: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आणि आपल्या सकस कलाकृतींमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गुणी कलाकारांची अदाकारी ‘बंधू’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ग्रामीण महाराष्ट्रातल्या एका छोट्या शेतकरी कुटुंबाची गोष्ट मांडणाऱ्या ‘बंधू’ चित्रपटात अभिनेता उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशी दोन भावांची भूमिका साकारत असून त्यांच्या सहचारिणींच्या भूमिकेत अभिनेत्री मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे दिसणार आहेत. Bandhu Marathi Movie:
आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे त्यांच्या अनुभवसंपन्न अभिनयातून या व्यक्तिरेखांना भावनिक आणि सशक्त आयाम मिळणार असून, दोघींची ही भूमिका चित्रपटाच्या कथानकात महत्त्वाची रंगत आणणार आहे.
अभिनयाची उत्तम जाण आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याची ताकद असलेल्या या कलाकारांनी आजवर आपल्या विविधांगी भूमिकांमधून रसिकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. आता ‘बंधू’ चित्रपटाच्या माध्यमातून हे कलाकार नात्यांच्या विविध पैलूंवर भाष्य करणारी हृदयस्पर्शी कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे या कलाकारांची पडद्यावरील जुळलेली केमिस्ट्री आणि ‘बंधू’मधून उलगडणारी नात्यांची अनोखी कहाणी पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या २० नोव्हेंबरला ‘बंधू’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
रजत बेदी प्रस्तुत जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेंमेंट यांच्या सहकार्याने साकारलेल्या ‘बंधू’ चित्रपटाची निर्मिती प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी केली आहे. चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी केले आहे. ‘आटपाडी नाईट्स’ आणि ‘सरला एक कोटी’ या यशस्वी चित्रपटांनंतर नितीन सुपेकर यांच्या ‘बंधू’ कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा नक्कीच उंचावल्या आहेत.
“नात्यांवर आधारित या चित्रपटात आम्ही जोडीच्या रूपात एकत्र येत आहोत, हा आमच्यासाठी खूप खास अनुभव आहे. कलाकार म्हणून एकमेकांसोबत काम करण्याचा आनंद तर आहेच; पण ‘बंधू’ मधील कौटुंबिक नातेसंबध आणि भावनिक पदर पडद्यावर साकारताना वेगळं समाधान मिळालं.” अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली.
Ans: ‘बंधू’ चित्रपट २० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
Ans: उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशी, मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Ans: नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन केले आहे.






