Gunmaaster G9 ’च्या गाण्यावरून नवा वाद! अवनीत कौरच्या डान्स स्टेप्स पाहून नेटकरी संतापले

Gunmaaster G9: इम्रान हाश्मीच्या ‘गनमास्टर जी९’मधील आयटम साँगवरून वाद निर्माण झाला आहे. अवनीत कौरच्या डान्स स्टेप्सवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Published on: 
Updated on: 

अभिनेता इम्रान हाश्मीचा ‘गनमास्टर जी९’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळत असून, इम्रान हाश्मी आणि जेनेलिया डिसूझा यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र, चित्रपटातील एका आयटम साँगमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘दिल के थिएटर में २०० करोड मरुंगी पिया’ या गाण्यात अभिनेत्री अवनीत कौर दिसत असून, तिच्या डान्स स्टेप्सवर सोशल मीडिया युजर्सनी आक्षेप घेतला आहे.

अवनीत कौरच्या डान्स स्टेप्सवर नेटकरी नाराज

‘गनमास्टर जी९’मधील ‘दिल के थिएटर में २०० करोड मरुंगी पिया’ हे गाणे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या गाण्यात अवनीत कौर आयटम नंबर करताना दिसत आहे. मात्र, तिच्या डान्सची कोरिओग्राफी अनेक नेटकऱ्यांना आवडलेली नाही. गाण्यातील काही डान्स स्टेप्सवर आक्षेप घेत युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.

अवनीत कौर २५ वर्षांची असून, तिच्याकडून अशा प्रकारच्या बोल्ड डान्स स्टेप्स करून घेण्याची गरज काय होती, असा सवाल काही युजर्सनी उपस्थित केला आहे. या गाण्यामुळे अवनीत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. अद्याप अवनीत कौर किंवा चित्रपटाच्या टीमकडून या वादावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

‘अभिनेत्रींचे लैंगिकीकरण कधी थांबणार?’ नेटकऱ्यांचा सवाल

या गाण्यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले, “अवनीत कौर नुकतीच २५ वर्षांची झाली आहे आणि हा किती मूर्खपणा आहे. तिला आयटम नंबरमध्ये का ढकलले जात आहे? या सगळ्याची काय गरज होती? आधी ‘पेड्डी’ आणि आता हे. अभिनेत्रींचे हे लैंगिकीकरण कधी थांबणार?”

दुसऱ्या एका युजरने गाण्याच्या कोरिओग्राफीवर नाराजी व्यक्त करत, “ही काय कोरिओग्राफी आहे? हा निव्वळ मूर्खपणा आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. तर आणखी एका युजरने अवनीत कौर आणि इम्रान हाश्मी यांच्या वयातील अंतराचा उल्लेख करत या गाण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

‘पेड्डी’ चित्रपटातील जान्हवी कपूरच्या लूकवरही झाला होता वाद

याआधी राम चरणच्या ‘पेड्डी’ चित्रपटातील अभिनेत्री जान्हवी कपूरच्या लूकवरूनही सोशल मीडियावर वाद निर्माण झाला होता. चित्रपटातील तिचा बोल्ड लूक पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. हा वाद वाढल्यानंतर दिग्दर्शक बुच्ची बाबू सना यांनी प्रेक्षकांची माफी मागितली होती.

जान्हवी कपूरनेही ‘कॉफी विथ करण ९’मध्ये या प्रकरणावर भाष्य केले होते. तिच्या मते, हा तिच्या आयुष्यातील चुकीच्या निर्णयांपैकी एक होता. तसेच तिची दृश्ये अशा पद्धतीने दाखवली जातील, याची तिला कल्पना नव्हती, असेही तिने सांगितले होते. आता ‘गनमास्टर जी९’मधील अवनीत कौरच्या डान्स स्टेप्सवरून सोशल मीडियावर नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.