(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Jayanti 2 Movie:कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना रॅगिंग, जातीभेद आणि मानसिक छळाला सामोरं जाणाऱ्या विद्यार्थ्यांची व्यथा अनेकदा समोर येते. कायदे आणि नियम असतानाही अशा घटना पूर्णपणे थांबलेल्या नाहीत. विशेषतः अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांना जातीआधारित रॅगिंग आणि भेदभावाचा सामना करावा लागतो. याच गंभीर आणि संवेदनशील विषयावर भाष्य करणारा ‘जयंती २’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.
या चित्रपटाचा रंजक आणि प्रभावी ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. ट्रेलरमध्ये कॉलेजमधील रॅगिंग, जातीभेद आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संघर्षाची झलक पाहायला मिळते. ‘जयंती २’ हा चित्रपट येत्या ११ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
‘जयंती २’मध्ये चंद्रपूरसारख्या भागातून उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या पायल या तरुणीची कथा मांडण्यात आली आहे. उच्च शिक्षण पूर्ण करून शेती करण्याचं स्वप्न पायलने उराशी बाळगलेलं असतं. मात्र, कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिच्यासमोर रॅगिंग आणि भेदभावाचं वास्तव उभं राहतं.
या त्रासाला पायल विरोध करते आणि त्यातून एका मोठ्या संघर्षाला सुरुवात होते. या संघर्षात पायलचं पुढे काय होतं? तिला न्याय मिळतो का? तिच्या स्वप्नांचं काय होतं? या प्रश्नांची उत्तरं चित्रपटातून मिळणार आहेत.
मात्र, ही कथा केवळ पायलपुरती मर्यादित नाही. कॉलेज प्रशासनाचा दृष्टिकोन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून मिळणारी वागणूक तसेच शिक्षण व्यवस्थेतील राजकारण आणि भेदभावाचे विविध पैलूही या चित्रपटातून समोर आणण्यात आले आहेत.
आधुनिक काळातही शिक्षणाच्या ठिकाणी जातीय भेदभाव आणि मानसिक छळाच्या घटना घडताना दिसतात. याच वास्तवावर ‘जयंती २’ भाष्य करतो. चित्रपटातून या प्रश्नांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मांडण्यासोबतच प्रेक्षकांसमोर अनेक अस्वस्थ करणारे प्रश्नही उपस्थित केले जाणार आहेत.
‘जयंती २’ची निर्मिती मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओने केली आहे. चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन शैलेश बळीराम नरवाडे यांचं आहे.
‘जयंती’ चित्रपटाचा प्रमुख चेहरा असलेला अभिनेता ऋतुराज वानखेडे या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत पायल जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तरदार, विजय निकम, राजकुमार जरांगे आणि मानसी सुभाष यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
चित्रपटासाठी संजीवकुमार हिल्ली यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिलं असून, संकलन फैसल महाडिक यांनी केलं आहे. डॉ. सुहास अंबादे, सुहास मुंडे आणि सौरभ गुरू यांनी लिहिलेल्या गीतांना ओंकारस्वरूप यांचं संगीत लाभलं आहे. तर पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांचं आहे.
‘जयंती २’चा ट्रेलर प्रभावी असून पायलच्या वाट्याला येणारा भेदभाव आणि त्यातून उभा राहणारा संघर्ष याची झलक यात पाहायला मिळते. त्यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
Drishyam 3: अजय देवगणने घेतलं तब्बल येवढं कोटी मानधन? ‘दृश्यम ३’मधील कलाकारांची फी ऐकून बसेल धक्का!
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जयंती’ या चित्रपटाने सामाजिक विषयामुळे मोठी चर्चा घडवून आणली होती. आता शिक्षण क्षेत्रातील भेदभाव, रॅगिंग आणि त्यामागील राजकारण या विषयांना ‘जयंती २’ने हात घातला आहे. दमदार कथानकाला अनुभवी कलाकारांची साथ मिळाल्याने हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘जयंती २’ येत्या ११ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.






