(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Prajakta Mali Gauri Movie: मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा निर्माती म्हणून सज्ज झाली आहे. तिच्या आगामी ‘गौरी’ या मराठी चित्रपटाची घोषणा दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आली असून, चित्रपटाचं पोस्टरही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या चित्रपटात प्राजक्ता माळी मध्यवर्ती भूमिका साकारणार असून, दिग्दर्शनाची जबाबदारी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आदिनाथ एम. कोठारे सांभाळणार आहेत. एनएच स्टुडिओज आणि शिवोहम क्रिएशन्स प्रस्तुत हा रहस्यमय-रोमांचक चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘पाणी’ या चित्रपटातून दिग्दर्शनाची वेगळी छाप उमटवणारे आदिनाथ कोठारे आता ‘गौरी’च्या माध्यमातून एक नवी कथा घेऊन येत आहेत. हा चित्रपट एका स्त्रीच्या आणि तिच्या कुटुंबाच्या आयुष्याभोवती फिरणार असला, तरी त्याचा विषय त्यापलीकडचा आहे. अन्यायाविरोधात लढणाऱ्या एका स्त्रीच्या पाठीशी दुसऱ्या स्त्रीने उभं राहणं आणि न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणं, हा महत्त्वाचा विचार या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे.
आजूबाजूला घडणाऱ्या स्त्रियांवरील अन्यायाच्या घटनांवर संवेदनशीलपणे भाष्य करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार आहे. पोस्टरमध्ये प्राजक्ता माळी ‘गौरी’च्या भूमिकेत दिसत आहे. मात्र, चित्रपटाच्या कथानकाबरोबरच इतर कलाकारांची नावंही अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे ‘गौरी’च्या माध्यमातून नेमकी कोणती गोष्ट उलगडणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
आदिनाथ कोठारे म्हणतात, ‘गौरी’ची गोष्ट वेगळा दृष्टिकोन मांडणारी
दिग्दर्शक आदिनाथ एम. कोठारे यांनी चित्रपटाविषयी आपली भावना व्यक्त केली. ते म्हणाले, “दिग्दर्शक म्हणून चित्रपटाची कथा प्रामाणिकपणे प्रेक्षकांसमोर मांडणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं असतं. ‘गौरी’च्या निमित्ताने आम्ही याआधी मराठी चित्रपटसृष्टीत कधीही न हाताळली गेलेली आणि महत्त्वाचा विचार मांडणारी गोष्ट घेऊन येत आहोत. या चित्रपटातून एका मुलीचा संघर्ष, नातेसंबंध आणि न्याय या विषयांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन प्रेक्षकांसमोर येईल. असा विषय दिग्दर्शक म्हणून मांडायला मिळतोय यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो.”
प्राजक्ता माळीची निर्माती म्हणून नवी जबाबदारी
अभिनेत्री प्राजक्ता माळीने याआधी ‘फुलवंती’च्या माध्यमातून निर्माती म्हणून आपली ओळख निर्माण केली. आता ‘गौरी’च्या निमित्ताने ती पुन्हा एकदा निर्मिती क्षेत्रात सक्रिय झाली आहे. या चित्रपटात अभिनयासोबतच निर्माती म्हणूनही ती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
याविषयी प्राजक्ता माळी म्हणाली, “‘फुलवंती’ हा चित्रपट नवरात्रीत नवमीला प्रदर्शित झाला होता. तसेच, ‘फुलवंती’नंतर निर्माती म्हणून मी घेऊन येत असलेल्या ‘गौरी’ची घोषणाही दशमी अर्थात दसऱ्याला होतेय, हा सुंदर योग आहे. नऊ दिवसांच्या लढाईनंतर दशमीला देवीने महिषासुराचा वध केला होता. त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक स्त्रीने तिच्या अवतीभवती असणाऱ्या प्रत्येक महिषासुराचा वध करावा, हीच भावना या निमित्ताने मनात आहे. एका स्त्रीने ठरवलं तर ती किती धाडसी निर्णय घेऊ शकते, हे यातून आपल्याला पाहायला मिळेल. अभिनेत्री आणि निर्माती अशा दोन्ही भूमिका निभावताना स्त्री सशक्तीकरणासाठी योगदान देण्याचा माझा प्रयत्न आहे.”
आशियातील सर्वात मोठा चित्रपट संग्रह असलेल्या एनएच स्टुडिओजने चित्रपट हक्कांचे परवानाकरण, वितरण तसेच हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या निर्मिती क्षेत्रात काम केलं आहे. एनएच स्टुडिओज आणि शिवोहम क्रिएशन्स मिळून ‘गौरी’ची निर्मिती करत आहेत.
नरेंद्र हिरावत, श्रेयांस हिरावत, प्राजक्ता माळी आणि श्वेता माळी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. महिलाकेंद्रित कथानक, अन्यायाविरोधातील लढा, आदिनाथ कोठारे यांचं दिग्दर्शन आणि प्राजक्ता माळीची दुहेरी जबाबदारी यामुळे ‘गौरी’ या आगामी मराठी चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या चित्रपटातून स्त्रीच्या संघर्षाची आणि न्यायाच्या लढ्याची कहाणी कशा पद्धतीने मांडली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.






