Tandel Marathi Movie: समुद्राशी नातं, संघर्षाची कहाणी! सयाजी शिंदे आणि ओम भुतकर यांच्या ‘तांडेल’ची घोषणा

Tandel Marathi Movie: सयाजी शिंदे आणि ओम भुतकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘तांडेल’ या मराठी चित्रपटाचा टायटल टीझर प्रदर्शित झाला आहे. अथांग स्टुडिओजची ही पहिली निर्मिती २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 ( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Published on: 
Updated on: 

Tandel Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एका नव्या चित्रपटाची भर पडणार असून, ‘तांडेल’ या आगामी मराठी चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. दिग्गज अभिनेते सयाजी शिंदे आणि आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेता ओम भुतकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा थरारक टायटल टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यातून चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अथांग स्टुडिओजच्या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणा

‘अथांग स्टुडिओज’ या नव्या चित्रपट निर्मिती संस्थेचा शुभारंभ ‘तांडेल’ या पहिल्या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. वेगळ्या आणि आशयपूर्ण कथा प्रेक्षकांसमोर आणण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या स्टुडिओच्या पहिल्याच चित्रपटाचा विषय लक्षवेधी आहे. प्रदर्शित झालेल्या टायटल टीझरमधून चित्रपटाच्या कथाविश्वाची प्रभावी ओळख करून देण्यात आली आहे.

 ( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Kiska Kasoor Trailer: जुळ्या भावांमधील नात्यात विश्वासघाताची ठिणगी! ‘किसका कसूर’चा थरारक ट्रेलर रिलीज, 'या' तारखेला होणार रिलीज

पारंपरिक मच्छिमाराच्या आयुष्याची गोष्ट मांडणार ‘तांडेल’

‘तांडेल’ची कथा आणि दिग्दर्शन संदिप पांडुरंग माने यांचे आहे, तर पटकथा आणि संवादलेखनाची जबाबदारी किरण यज्ञोपवित यांनी सांभाळली आहे. एका पारंपरिक मच्छिमाराची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. समुद्राशी माणसाचे असलेले अतूट नाते, त्याचे जगणे आणि बदलत्या काळातील संघर्ष यांचे चित्रण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक संदिप पांडुरंग माने म्हणाले, “‘तांडेल’ ही आमची पहिली कलाकृती म्हणजे केवळ पारंपरिक मासेमारीची कथा नाही, तर आधुनिकीकरणाच्या वेगात आपले अस्तित्व जपू पाहणाऱ्या माणसांच्या जगण्याची ही गोष्ट आहे. गेली बारा वर्षे आम्ही जपलेले सिनेमाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या प्रवासातला ‘तांडेल’ हा महत्त्वाचा टप्पा आहे. सयाजी शिंदे आणि ओम भुतकर यांच्यासारखे ताकदीचे कलाकार या कथेला एक वेगळीच उंची देतील.”

अथांग स्टुडिओजच्या माध्यमातून निर्मात्या अमृता संदिप माने यांनी एका आशयघन आणि भव्य विषयाची निवड केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार कलाकृती सादर करण्याचा त्यांचा मानस आहे. या प्रकल्पाच्या निर्मिती प्रक्रिया आणि नियोजनाची जबाबदारी कार्यकारी निर्माता दत्तसंग्राम वासमकर यांनी सांभाळली आहे. तर समुद्राची अथांगता आणि त्यातील संघर्षाचा थरार छायाचित्रकार अभिमन्यु डांगे यांनी आपल्या कॅमेऱ्यातून प्रभावीपणे टिपला आहे.

सयाजी शिंदे आणि ओम भुतकर पहिल्यांदाच एकत्र झळकणार?

दरम्यान, चित्रपटातील सयाजी शिंदे आणि ओम भुतकर यांचे लुक तसेच इतर कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे या चित्रपटात नेमके कोणते कलाकार दिसणार आणि त्यांची भूमिका कशी असणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. २०२७ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘तांडेल’च्या टायटल टीझरने आतापासूनच सिनेरसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 ( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Pyaade Trailer: जिमी शेरगिल आणि प्रनूतन बहलची दमदार एन्ट्री! ‘प्यादे’चा ट्रेलर प्रदर्शित, चित्रपटाची उत्सुकता वाढली