Exclusive: मिताली जगतापचा अभिनयाचा प्रवास
Exclusive: स्टार प्रवाहवरील सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे ‘पाठराखीण’. या मालिकेत आपल्या मुलीला सर्व चांगलं मिळावं असं मत असणारी मामी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मिताली जगताप वराडकर गेले दशकभर चित्रपट, मालिका क्षेत्रातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. नवराष्ट्रच्या ‘माझ्यातील दुर्गा’ या सिरीजच्या निमित्ताने मितालीने अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत.
मितालीला सुरुवातीला कशी आहेस असं विचारल्यावर अगदी सहजपणाने म्हणाली की, ‘आयुष्यात सतत काहीतरी करत रहायचं आहे हे कायम वाटत होतं आणि आता तशी परिस्थती आहे. त्यामुळे मजा येते आहे.’
सध्या स्टार प्रवाह वरील पाठराखीण या मालिकेत तुमची भूमिका गाजत आहे….पण या सगळ्या मागे सुरुवातीचा संघर्ष कसा होता? यावर क्षणाचाही विलंब न करता मात्र अगदी मोजके शब्द वापरत आणि आपल्या भावना व्यक्त करत मितालीने सांगितले की, ‘मी म्हणेन माझ्या आयुष्यातील संघर्ष तुटपुंजा होता. आई-वडिलांचा आशीर्वाद होता. वडील कवी होते आणि आई शिक्षिका होती. तेव्हा आईने त्याकाळी माझ्यातील कला ओळखून भरतनाट्यम ही कला शिकायला प्रोत्साहित केलं होतं. मराठा असूनही आईवडील खूपच आधुनिक विचारांचे होते. औरंगाबादची असूनही मी जेव्हा मुंबईत येण्याचा निर्णय घेतला तेव्हा कुटुंबाचा पाठिंबा होता.
पण मुंबईत आल्यानंतर थोडा स्ट्रगल होता. मुंबईचे रस्ते, बिल्डिंग्ज यातच हरवले होते. यातून रहायचं कसं हा प्रश्न होता. जेव्हा काम शोधायला सुरूवात केली तेव्हा काही ठिकाणी असं जाणवलं की, इथे चौकट आहे. अभिनेत्री आणि नटी वेगळी असते. नटीसाठी रंगरूप, गोरेपणा असलाच पाहिजे असं अजूनही असल्याचं मला वाटतं. तुमच्या रंगामुळे कुठे ना कुठेतरी तुम्हाला बाजूला ठेवलं जाईल विचारलं जाणार नाही ही परिस्थिती आजही आहे. आजही अभिनेत्री दिसायला सुंदर असावी असा समज असल्याचं वाटतं. माझा हा संघर्ष मात्र त्याकाळीही होता असं मी म्हणेन’
Exclusive: ‘आताची स्त्री ही स्वतःसह कुटुंबाला पुढे घेऊन जाणारी आहे…’, अनघा ठाकूरचं परखड मत
या संघर्षाच्या काळात काही रियालिटी चेक मिळाले का? यावर मिताली म्हणाली की, ‘नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर खूप काम करायचं आहे आणि लोक आता माझ्याकडे येऊन काम देतील असं वाटलं पण त्याच प्रकारची कामं आली. पण मला मात्र एकसुरी व्हायचं नाही हे मनात कुठेतरी पक्कं होतं. २०११ पासून जो संघर्ष सुरु झाला तो १० वर्ष सुरूच राहिला असं मला वाटतं. माझ्यासाठी एक अभिनेत्री म्हणून वेगळेपण काय देता येतं हे सर्वात जास्त महत्त्वाचं होतं. ती कामाची वाट पाहताना खूपच दमछाक झाली. रोज थकायला होत होतं पण तरीही कुठेही हार न मानता आता मात्र मी सांगू शकते की, मला जे हवं होतं ते आता घडायला लागलं आहे.’
या सगळ्या संघर्षातून तू स्वतःला कसं उर्जात्मक ठेवतेस? असं विचारल्यावर मितालीने सांगितलं की, ‘जेव्हा आपल्याला टिकून राहयंच असतं ना तेव्हा कधी कधी मनाविरूद्धही काम करावं लागतं, काही प्रोजेक्ट करावे लागतात. पण माझ्यातली अभिनेत्री समाधानी होण्यासाठी मी कायम वाट पाहिली आहे आणि ते काम माझ्याकडे येईल हा विश्वास मी कधीही डामाडौल होऊ दिला नाही. मिताली म्हणून माझा तो निर्धार आजही तसाच आहे आणि लवकरच तो पूर्ण होईल असं वाटत आहे.’
तू स्पष्टवक्ती आहेस; इंडस्ट्रीत डिप्लोमॅटिक न वागल्यामुळे कधी चांगल्या भूमिका गमवाव्या लागल्या आहेत का? यावर मितालीने अगदी सकारात्मकतेने उत्तर दिलं, ‘मला असं वाटतं की, तुमच्या नशिबात जे लिहिलं आहे ते तुम्हाला मिळणार. त्यासाठी तुम्हाला खोटं वागायची गरज नाही. मी अजिबात सोशल नाही, मला पार्टी, गेट टुगेदर असे कार्यक्रम आवडत नाही. असं वागले तर मी खोटं वागतेय असं वाटायला लागतं त्यामुळे कामावर विश्वास ठेवते. आजूबाजूला जे चालतं ते इतरांच्या दृष्टीनेही योग्यच आहे असं मला वाटतं. पण मिताली म्हणून कदाचित मी हे करू शकत नाही’
आजकाल फॉलोअर्स बघून कास्टिंग केलं जातं तुला कितपत योग्य वाटतं? मितालीचं उत्तर अगदी सडेतोड होतं, ती म्हणाली, ‘हे खूप चूक आहे. जे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांचं मला कौतुक आहेच. लोकांना १० सेकंदात आकर्षित करण्याची क्विलिटी आहेच त्यांच्यात. पण अभिनय आणि चित्रपट बघायला यावा यासाठी ते काम किती करतात आणि हे गणित किती योग्य आहे याबाबत मला शंका आहे. त्यामुळे अभिनय माहीत नसलेल्या व्यक्तींना घ्यावं या मताची मी अजिबात नाही.’
स्वतःतली दुर्गा तुला कधी दिसली, तू भूमिका कशी निवडतेस? मिताली अगदी शांतपणे म्हणाली की, ‘मला काम करताना काहीतरी वेगळं केलं किंवा एखाद्या भूमिकेला मी किती न्याय दिला हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. पण तेव्हा विचार करताना नवीन डायरेक्टर असं काही असेल तर मी विचार करत नाही. भूमिकेचा विचार अधिक करते.
पूर्ण आयुष्यात मला असं वाटतं की स्वतःला ठामपणे सिद्ध करत आणि स्वतःवर आत्मविश्वास ठेऊन ते मिळविण्यासाठी मला १० वर्षांचा कालावधी लागला. हा कालावधी खूपच कठीण होता, मोठा होता आणि त्यासाठी मी थांबायला तयार होते आणि मी ते केलं याबद्दल मला बरं वाटतं.’
सुरक्षेसाठी कधी स्टँड घ्यावा लागला का? मितालीने यावेळी आपल्या अगदी पहिल्यापासूनचा अनुभव सांगितला, ‘घर सोडून मुंबईत आले तेव्हापासून माहीत होतं की, स्वतःला सांभाळायचं आहे. तेव्हा मी तितकी आत्मविश्वासी नव्हते. पण तेव्हा मी कायम आत्मविश्वास असल्यासारखं नेहमी भासवत आले. त्यामुळे आईवडिलांनी दिलेला विश्वास सांभाळायचा आहे हे कायम मनात होतं आणि मी कायम तशीच राहिले. त्यामुळे माझ्या आयुष्यात असं काहीच घडलं नाही की मला त्रास होईल आणि यासाठी मी नेहमीच स्वतःला नशीबवान समजते.
ट्रोलिंगकडे कशा पद्धतीने पाहतेस असं विचल्यावर मिताली म्हणाली की, ‘प्रेक्षकांना पॅटर्न स्वीकारणं ना खूपदा कठीण जातं असं मला वाटतं. एखादी अभिनेत्री एखादी भूमिका करत असेल तर तीच तीच मिळण्याची वा करण्याची गरज नाही. अभिनेत्री म्हणून तुम्ही वेगळं काहीतरी दिलं तर प्रेक्षकांना आणि इतरांनाही ते आवडेल असं वाटतं. ट्रोलिंगकडे जास्त लक्ष देऊ नये असं वाटतं. पाठराखीणमध्ये मी सध्या थोडीशी ग्रे व्यक्तिरेखा करतेय आणि माझ्यासाठी ही वेगळी भूमिका आहे. प्रेक्षकांना मला सांगावं वाटतं की, हिरॉईन्सना एका चौकटीत नका ठेऊ. तर महिलांना सांगावं वाटतं की, तुम्ही कोणत्याही वयात काम करू शकता. स्वप्नं बघा, स्वतःवर प्रेम करा. हिंमत नका सोडू. तुमची स्वप्नं साकार होण्यासाठी मेहनत करा आणि पुढे जा’
स्त्री कलाकारांना आजही कोणते संघर्ष भोगावे लागतात का? यावर मिताली म्हणाली, ‘माझ्या दृष्टीने महिलांना खूप लवकर वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. तुम्ही कोणाबरोबर आहात, काय करताय, कोणाबरोबर जाता हे सगळं इतर कोणीही विचार करायची गरज नाही आणि प्रत्येक स्त्री चा हा संघर्ष कायम असतो असं मला वाटतं.’
याशिवाय मितालीने Gen Z बाबतही आपले विचार स्पष्ट करत अत्यंत स्मार्ट आणि क्लिअर ही पिढी असल्याचं सांगितलं. कुटुंबासह देशालाही सांभाळणारी ही पिढी असल्याचं आपल्याला वाटतं असं स्पष्ट मत मांडलं. तसंच प्रत्येकाला आपण जे मनात आणतो ते जगण्याचं आणि करण्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं आणि आई हीच आपल्या आयुष्यातील दुर्गा असल्याचंही तिने जाता जाता आवर्जून सांगितलं.






