(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Kon Honaar Crorepati: सोनी मराठीवरील लोकप्रिय गेम शो ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वात यावेळी मनोरंजनाची रंगत आणखी वाढणार आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे एका विशेष भागात एकत्र येणार आहेत. या भागात दोघींच्या मनमोकळ्या गप्पा, चित्रपटसृष्टीतील आठवणी, वैयक्तिक आयुष्यातील अनुभव आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन उलगडणार आहे. ९० च्या दशकातील स्टारडमपासून ते आयुष्यातील कठीण प्रसंगांपर्यंत अनेक विषयांवर दोघी संवाद साधताना दिसणार आहेत.
बनिजय एशियाची निर्मिती असलेल्या ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. १२ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झालेलं हे पर्व सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता सोनी मराठीवर प्रसारित होत आहे. या पर्वात माधुरी दीक्षितने पहिल्या महिला सूत्रसंचालक म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. तिच्या सहजसुंदर शैलीमुळे आणि प्रेक्षकांशी साधलेल्या संवादामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली आहे.
आता या कार्यक्रमाच्या एका विशेष भागात सोनाली बेंद्रे सहभागी होणार आहे. माधुरी आणि सोनाली यांच्यातील मैत्रीपूर्ण संवादातून मनोरंजनविश्वातील आठवणींसोबतच त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे अनुभवही प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत.
सोनाली बेंद्रेने सांगितली ‘हॅपी पेट्स फाउंडेशन’मागची प्रेरणा
या गप्पांदरम्यान सोनालीने ‘हॅपी पेट्स फाउंडेशन’ सुरू करण्यामागची प्रेरणा सांगितली. प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करण्याची तिची इच्छा होती. मात्र, संपूर्ण प्राणी निवारा केंद्र चालवण्यासाठी आवश्यक असलेला वेळ, कौशल्य आणि व्यावसायिक व्यवस्थापन लक्षात घेता तिने वेगळा मार्ग निवडला. गरज असताना विद्यमान प्राणी निवारा केंद्रांना मदत करता यावी, या उद्देशाने तिने हे व्यासपीठ उभारल्याचं सांगितलं.
पंजाबी कुटुंबातील गमतीशीर अनुभवांचा उलगडा
गप्पांचा सूर हलकाफुलका होताच माधुरीने सोनालीला गोल्डी बेहलशी लग्न केल्यानंतर पंजाबी कुटुंबात प्रवेश करण्याचा अनुभव विचारला. यावर सोनालीने खाण्यापिण्याशी संबंधित काही मजेशीर आठवणी सांगितल्या.
तिच्या म्हणण्यानुसार, घरातील नाश्त्याचा बेत अगदी भरगच्च असायचा. नाश्ता सुरू असतानाच दुपारच्या जेवणाची चर्चा व्हायची, तर दुपारचं जेवण सुरू असतानाच रात्रीच्या जेवणाचं नियोजन केलं जायचं. सोनालीच्या या आठवणींमुळे दोघींमधील संवादाला आणखी रंग चढला.
जुही चावला की श्रीदेवी? माधुरीने दिलं मजेशीर उत्तर
या भागातील आणखी एक खास क्षण म्हणजे सोनालीने माधुरीसमोर ठेवलेला प्रश्न. ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री जुही चावला आणि श्रीदेवी यांच्यापैकी एकीची निवड करण्यास तिने माधुरीला सांगितलं.
यावर माधुरीने दोघींपैकी एकीची निवड करणं अशक्य असल्याचं सांगितलं. जुहीच्या विनोदी टायमिंगचं आणि तिच्या खळखळून हसण्याचं तिने कौतुक केलं. तर श्रीदेवीच्या अष्टपैलू अभिनयाचं आणि विविध भाषांमधील चित्रपटांतून दाखवलेल्या प्रतिभेचंही माधुरीने भरभरून कौतुक केलं.
या खास भागात दोन्ही अभिनेत्रींच्या मनोरंजनविश्वातील सुरुवातीच्या प्रवासालाही उजाळा मिळणार आहे. माधुरीने चित्रपटसृष्टीशी थेट संबंध नसलेल्या कुटुंबातून येताना आलेल्या अनुभवांविषयी सांगितलं. सुरुवातीला तिच्या पालकांच्या मनात असलेल्या साशंकतेपासून ते सूरज बडजात्या आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते राजकुमार बडजात्या यांच्याशी झालेल्या भेटीपर्यंतच्या आठवणी तिने शेअर केल्या. या भेटीनंतर तिच्या कुटुंबाचा चित्रपटसृष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचं तिने सांगितलं.
दुसरीकडे, सोनालीने दहावी पूर्ण केल्यानंतर मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश कसा केला, याचा रंजक किस्सा सांगितला. एका फॅशन शोमध्ये दुखापत झालेल्या मॉडेलच्या जागी तिला ऐनवेळी संधी मिळाली. या शोमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर तिच्यासाठी मॉडेलिंगच्या क्षेत्राचे दरवाजे उघडले.
पहिला कराराचा धनादेश हातात घेतल्यावर आपण किती आश्चर्यचकित झालो होतो, हे सांगताना सोनालीने तो धनादेश तिच्या सरकारी नोकरी करणाऱ्या वडिलांच्या जवळपास दोन महिन्यांच्या पगाराइतका असल्याचं नमूद केलं. या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्यासाठी तिने पालकांकडून तीन वर्षांची मुदत घेतली होती. यश मिळालं नाही, तर शिक्षणाकडे परत वळण्याचा आणि सरकारी नोकरी किंवा आयएएस सेवेत जाण्याचा पर्याय तिच्यासमोर होता. मात्र, तिच्या कारकिर्दीने पुढे मोठी झेप घेतली.
मायकेल जॅक्सनच्या कॉन्सर्टची आठवणही चर्चेत
माधुरीने सोनालीला मायकेल जॅक्सनच्या भारत भेटीदरम्यान त्याला भेटण्याच्या अनुभवाविषयीही विचारलं. सोनालीने सांगितलं की, सुरुवातीला ती त्याची फार मोठी चाहती नव्हती. कुटुंबीय आणि मित्रांसाठी कॉन्सर्टची तिकिटं मिळवण्याचा आनंद आणि पारंपरिक नऊवारी साडी नेसण्याची संधी यामुळे ती उत्सुक होती.
मात्र, प्रत्यक्ष कॉन्सर्टमध्ये मायकेल जॅक्सनचा दमदार वावर, नृत्यशैली आणि गायन पाहिल्यानंतर ती त्याची चाहती बनली. हा अनुभव तिच्यासाठी खास ठरल्याचं तिने सांगितलं.
कर्करोगाच्या अनुभवाबद्दल सोनालीने केलं मनमोकळं भाष्य
या भागातील भावूक क्षणांपैकी एक म्हणजे सोनालीने कर्करोगाच्या अनुभवाबद्दल केलेलं भाष्य. माधुरीने याविषयी विचारल्यानंतर सोनालीने उपचार आणि प्रकृतीत सुधारणा होण्याच्या प्रवासाबद्दल सांगितलं.
कर्करोगाकडे तिने पारंपरिक अर्थाने लढाई म्हणून पाहिलं नाही. शरीराशी संघर्ष करण्याऐवजी स्वतःकडे प्रेमाने आणि करुणेने पाहण्याचा, तसेच या अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न केल्याचं तिने सांगितलं. या दृष्टिकोनामुळे कठीण काळात तिला मानसिक शांतता मिळाल्याचंही ती म्हणाली. सोनालीचा प्रामाणिकपणा आणि आयुष्यातील आव्हानांकडे पाहण्याचा दृष्टिकोन ऐकून माधुरीने तिचं कौतुक केलं.
माधुरीच्या नृत्याने होणार भागाचा समारोप
हास्याचे क्षण, जुन्या आठवणी, करिअरमधील रंजक किस्से आणि आयुष्याला नवी दिशा देणारे अनुभव अशा विविध रंगांनी हा विशेष भाग सजणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी माधुरी दीक्षित आपल्या लोकप्रिय ‘काहे छेड मोहे’ या गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करणार आहे.
माधुरी दीक्षित आणि सोनाली बेंद्रे यांच्या या खास गप्पा पाहण्यासाठी ‘कोण होणार करोडपती’ सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता सोनी मराठीवर पाहता येणार आहे. हा कार्यक्रम सोनी लिव्हवरही उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.






