शिवानी रांगोळेने कोण यशवंत पानसरे या सिरीजमधील भूमिकेबाबत केले भाष्य
पानसरे आणि जान्हवी या दोन वेगवेगळ्या पिढ्यांचं प्रतिनिधित्व करतात. या प्रवासात ते एकमेकांकडून काय शिकतात? आणि खऱ्या आयुष्यात अभिनयाबद्दल तू भरत जाधव यांच्याकडून काय शिकलीस? असं विचारल्यावर शिवानी म्हणाली की, ‘मी जान्हवी ही भूमिका साकारत आहे. जान्हवी यंग असल्यामुळे तिच्या आयुष्यात अजून वाईट अनुभव आलेले नाहीत, त्यामुळे ती थोडी नाईव्ह असली तरी अभ्यासात प्रचंड हुशार आहे. कॉलेजपासून ती यशवंत पानसरेंना आदर्श मानत आल्यामुळे तिच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड विश्वास आहे. पण जर एखादी गोष्ट बरोबर नसेल, तर तिथे लगेच बोललंच पाहिजे असा तिचा आग्रह असतो. जिथे यशवंत सर त्यांच्या मॅच्युरिटीमुळे संयम ठेवण्याचा किंवा विचार करून बोलण्याचा सल्ला देतात, तिथे जान्हवीच्या मनात जे येतं ते ती थेट बोलून दाखवते. तिच्यातला हाच ‘फायर’ आणि हा वैचारिक विरोधाभास सिरीज पाहताना खूप रंजक वाटतो’
ही कथा व्यवस्था आणि संस्थांच्या अपयशावर भाष्य करते. या प्रकरणाचा तपास करताना जान्हवीला सत्ता आणि व्यवस्थेविषयी काय नव्याने समजतं? आणि त्यातील किती गोष्टी वास्तवाशी जुळतात? यावर शिवानी स्पष्टपणाने म्हणाली की, ‘शिक्षणामधून मिळणारे ज्ञान आणि प्रत्यक्ष आयुष्य आपल्याला काय शिकवतं, या दोन्ही गोष्टींचा समतोल साधणं खूप महत्त्वाचं असतं. जान्हवी जरी तिचे मत स्पष्टपणे मांडणारी असली, तरी या सिरीजच्या प्रवासात ती यशवंत पानसरेंकडून संयमाचं महत्त्व शिकते. बोलायच्या आधी विचार करणं आणि वेळेला तिचं काम करू देणं हेच सर्वात मोठं औषध असतं, हे तिला समजून येतं.’
जाताजाता जेव्हा शिवानीला विचारण्यात आलं की, आज इतक्या विविध प्रकारच्या कंटेंटमध्ये प्रेक्षकांनी ही मालिका का निवडावी? आणि त्यांना यातून काय मिळावं, अशी तुझी अपेक्षा आहे? त्यावर जराही न थांबता तिने पटकन उत्तर दिलं, ‘ही एक अत्यंत प्रेरणादायी मालिका आहे. अन्यायी जगात स्वतःचा आवाज शोधू पाहणाऱ्या आणि स्वतःची मूल्यं जपत काम पूर्ण करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ही गोष्ट आहे. प्रेक्षकांना यशवंत पानसरेंकडून प्रामाणिकपणा आणि जान्हवीकडून कल्पक उत्सुकता शिकायला मिळेल’. ही सिरीज सध्या प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.






