(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Nayi Naveli Box Office Collection: बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमच्या ‘नई नवेली’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात करणाऱ्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही कमाईत वाढ नोंदवली आहे. अवघ्या दोन दिवसांत चित्रपटाची जगभरातील एकूण ग्रॉस कमाई १०.३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
‘नई नवेली’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जगभरात ४.६ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ५.७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यामुळे दोन दिवसांतील चित्रपटाची एकूण जगभरातील ग्रॉस बॉक्स ऑफिस कमाई (GBOC) १०.३ कोटी रुपये झाली आहे. दुसऱ्या दिवशी कमाईत झालेली वाढ चित्रपटासाठी सकारात्मक मानली जात आहे.
फॅन्टसी, अॅक्शन आणि कौटुंबिक भावनांची सांगड घालणारा ‘नई नवेली’ प्रेक्षकांना एक वेगळा मनोरंजनात्मक अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. प्राचीन महाकाव्यांपासून प्रेरणा घेतलेली कथा, अनपेक्षित वळणं आणि चांगल्या-वाईटातील संघर्ष हे चित्रपटाचे प्रमुख आकर्षण आहे. यामी गौतम एका दमदार कलाकारांच्या संचासह आवस्थी कुटुंबाच्या विश्वात प्रेक्षकांना घेऊन जाते.
यामी गौतमचा वेगळा अंदाज, हटके व्यक्तिरेखा आणि हृदयस्पर्शी कौटुंबिक प्रसंग यामुळे चित्रपटाची चर्चा होत आहे. सणासुदीच्या काळात कुटुंबासोबत चित्रपट पाहण्याचा पर्याय म्हणूनही या चित्रपटाकडे पाहिले जात आहे.
बालाजी मोहन यांनी ‘नई नवेली’चे दिग्दर्शन केले असून, हिमांशू शर्मा आणि दिव्य निधी शर्मा यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. यामी गौतमसोबत आदिनाथ एम. कोठारे, अनुराग ठाकूर, सुनीता राजवर, मीता वशिष्ठ, आदित्य कुलश्रेष्ठ, सुस्मिता मुखर्जी आणि प्रतीक पचौरी हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसत आहेत.
आनंद एल. राय आणि हिमांशू शर्मा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर संगीताची जबाबदारी जी. व्ही. प्रकाश कुमार यांनी सांभाळली आहे.
अॅमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि कलर यलो प्रस्तुत ‘नई नवेली’ सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. दुसऱ्या दिवशी कमाईत झालेली वाढ पाहता, आगामी दिवसांत चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






