(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Rakhi Sawant: मनोरंजनविश्वात आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडली आहे. उत्तर प्रदेशातील एका न्यायालयाने २०१० मधील आत्महत्या प्रकरणात राखी सावंतविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. वारंवार समन्स बजावूनही ती न्यायालयात हजर न झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ डिसेंबर रोजी होणार आहे.
हे प्रकरण झाशी येथील हन्सारी प्रेम नगर परिसरातील रहिवासी लक्ष्मण अहिरवार यांच्या आत्महत्येशी संबंधित आहे. आरोपानुसार, राखी सावंतच्या ‘राखी का इन्साफ’ या टीव्ही शोमध्ये केलेल्या कथित अपमानास्पद टिप्पणीमुळे दुखावून लक्ष्मण अहिरवार यांनी १० नोव्हेंबर २०१० रोजी आत्महत्या केली होती.
या प्रकरणी लक्ष्मण यांच्या आई सावित्री यांनी प्रेम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ऑक्टोबर २०१० मध्ये प्रसारित झालेल्या शोच्या एका भागात राखी सावंतने आपल्या मुलाविषयी अपमानास्पद आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप त्यांनी केला होता.
वैवाहिक वादामुळे शोमध्ये घेतला होता सहभाग
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, लक्ष्मण अहिरवार आणि त्यांची पत्नी अनिता यांना त्यांच्या वैवाहिक वादावर चर्चा करण्यासाठी ‘राखी का इन्साफ’ या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते. पती-पत्नीमधील वादानंतर अनिता माहेरी परतली होती. याच प्रकरणादरम्यान राखी सावंतने केलेल्या कथित वक्तव्यांमुळे लक्ष्मण दुखावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
जिल्हा सरकारी वकील (फौजदारी) मृदुलकांत श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वारंवार समन्स बजावूनही राखी सावंत न्यायालयात हजर झाली नाही. त्यामुळे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) अंजली यांनी शुक्रवारी तिच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ डिसेंबर रोजी होणार आहे.
Albatya Galbatya: मराठी रंगभूमीवर इतिहास घडला! ‘अलबत्या गलबत्या २.०’चे एकाच दिवशी सलग ७ प्रयोग
राखी सावंत यापूर्वी गायक मिका सिंगसोबतच्या वादामुळेही चर्चेत आली होती. सुमारे नऊ महिन्यांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये बोलताना तिने मिका सिंगच्या आवाजाबाबत टिप्पणी केली होती. “सुरुवातीला मिकाचा आवाज चांगला नव्हता, पण ज्या दिवशी त्याने मला किस केले, त्याचा आवाज मधुर झाला,” असे ती म्हणाली होती. या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा जुन्या वादाची चर्चा सुरू झाली होती.
ही घटना २००६ मधील आहे. मिका सिंगने आयोजित केलेल्या वाढदिवसाच्या पार्टीत त्याने जबरदस्तीने किस केल्याचा आरोप राखी सावंतने केला होता. या प्रकरणी ११ जून २००६ रोजी तिने मिका सिंगविरोधात एफआयआर दाखल केला होता. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ आणि ३२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. जवळपास १७ वर्षांनंतर हे प्रकरण परस्पर संमतीने मिटवण्यात आले.
आता २०१० मधील आत्महत्या प्रकरणात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याने राखी सावंत पुन्हा चर्चेत आली आहे. या प्रकरणातील पुढील न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






