(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
सोनू सूदने नेपाळमधील आपल्या प्रवासाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो स्थानिक नागरिक आणि लहान मुलांची भेट घेताना दिसत आहे. त्यांच्याशी संवाद साधत सोनू त्यांचं दुःख आणि परिस्थिती जाणून घेताना दिसतोय.
फोटो शेअर करताना सोनूने या निष्पाप मुलांनी आपली घरं, कुटुंबं आणि बालपण गमावल्याचं म्हटलं आहे. मात्र, या कठीण काळात आपण सर्वजण मिळून नव्याने सुरुवात करू शकतो, असा आशावादी संदेशही त्याने दिला आहे. नेपाळमधील नागरिकांनी या संकटाच्या काळात स्वतःला एकटं समजू नये, आपण त्यांच्या सोबत आहोत, असं सोनूने आपल्या पोस्टमधून सांगितलं.
सोनूच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याचं भरभरून कौतुक केलं आहे. अनेकांनी त्याला ‘खरा हिरो’ आणि ‘देवदूत’ म्हणत त्याच्या मदतकार्याचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, सोनू सूदने माध्यमांशी संवाद साधताना नेपाळला जाण्यामागचं कारण सांगितलं. पूरग्रस्तांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी आणि त्यांना आवश्यक जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी आपण नेपाळमध्ये आल्याचं त्याने सांगितलं.
भारताकडून मोठ्या प्रमाणात मदतसामग्री नेपाळमध्ये आणण्यात आली आहे. गरजू नागरिकांना मदत करणं आणि त्यांचं आयुष्य पुन्हा रुळावर आणण्यासाठी शक्य तेवढा हातभार लावणं हे आपलं ध्येय असल्याचं सोनूने स्पष्ट केलं.
View this post on Instagram
संकटाच्या काळात गरजूंच्या मदतीसाठी पुढे येणं ही समाजातील प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं सोनूने म्हटलं. पूरग्रस्तांसाठी ब्लँकेट्स, शिधा आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू नेपाळमध्ये आणण्यात आल्या आहेत.
या मदतीमुळे पूरग्रस्तांना काहीसा दिलासा मिळावा आणि त्यांना पुन्हा नव्याने आयुष्य उभं करण्यासाठी बळ मिळावं, हा सोनूचा प्रयत्न आहे. नेपाळमधील या संकटाच्या काळात सोनू सूदने दाखवलेल्या माणुसकीमुळे त्याच्यावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.






