(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
OTT Release: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रेक्षकांसाठी OTTवर मनोरंजनाची मोठी मेजवानी पाहायला मिळणार आहे. नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, जिओ हॉटस्टार आणि ZEE5 यांसह विविध OTT प्लॅटफॉर्मवर अनेक नवे चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे घरबसल्या सिनेमा किंवा सीरिज पाहण्याचा प्लॅन करत असाल, तर या आठवड्यात तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत.
स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘द रिव्होल्युशनरीज’ ही बहुप्रतीक्षित ऐतिहासिक ड्रामा सीरिज ११ सप्टेंबरला प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. निखिल अडवाणी यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं असून ती संजीव सान्याल यांच्या Revolutionaries: The Other Story of How India Won Its Freedom या पुस्तकावर आधारित आहे. भुवन बाम, रोहित सराफ, प्रतिभा रांता आणि गुरफतेह पीरजादा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘घमासान’
अर्शद वारसी आणि प्रतीक गांधी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘घमासान’ हा क्राइम ड्रामा ११ सप्टेंबरपासून ZEE5 वर स्ट्रीम होणार आहे. तिग्मांशु धुलिया दिग्दर्शित या चित्रपटात बुंदेलखंडच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी आणि कुख्यात दरोडेखोर यांच्यातील संघर्ष पाहायला मिळणार आहे. अर्शद वारसी दरोडेखोराच्या भूमिकेत दिसणार असून प्रतीक गांधी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत.
‘चुंबक’
‘चुंबक’ ही कॉमेडी-फॅमिली वेब सीरिज १० सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ‘चुंबक कॉलनी’मध्ये शेजारी राहणाऱ्या विविध कुटुंबांच्या आयुष्यातील गमती-जमती आणि नातेसंबंधांभोवती या सीरिजची कथा फिरते. नीना गुप्ता, देवेन भोजानी, अमायरा दस्तूर, अर्जुन बिजलानी, अनंत व्ही. जोशी आणि हेली शाह यांसारखे कलाकार यात दिसणार आहेत.
Bigg Boss 20: बिग बॉसमध्ये पुण्याच्या मराठमोळ्या रॅपरची एन्ट्री; ‘Yeda Yung’ फेम Yung DSA कोण?
‘जंगल टेल्स विथ मोगली’
मुलांसोबत OTTवर काहीतरी मनोरंजक पाहण्याचा विचार करत असाल, तर ‘जंगल टेल्स विथ मोगली’ हा एक पर्याय आहे. ही अॅनिमेटेड मालिका १२ सप्टेंबरपासून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. मोगलीच्या जंगलातील साहसांवर आधारित ही मालिका खास मुलांसाठी आणि कुटुंबासाठी मनोरंजक ठरणार आहे.
‘फौदा’ सीझन ५
थरार आणि राजकीय संघर्ष आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘फौदा’चा पाचवा सीझन खास आहे. ही सायकोलॉजिकल-पॉलिटिकल थ्रिलर सीरिज ८ सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. त्यामुळे या आठवड्याची सुरुवातच थरारक सीरिजने करता येणार आहे.
‘अली बाबा और 40 भूत’
‘अली बाबा और 40 भूत’ ही हॉरर-कॉमेडी आणि मिस्ट्री सीरिज ११ सप्टेंबरपासून जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. आशा नेगी आणि विशाल वशिष्ठ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरिजमध्ये लोकप्रिय ‘अली बाबा आणि चाळीस चोर’ या कथेला हॉरर-कॉमेडीचा नवा ट्विस्ट देण्यात आला आहे. सीरिजचे भाग दर शुक्रवारी प्रदर्शित होणार आहेत.
एकूणच, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात OTTवर थ्रिलर, क्राइम, हॉरर-कॉमेडी, ऐतिहासिक ड्रामा आणि अॅनिमेशन अशा विविध प्रकारचा कंटेंट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या आवडीच्या जॉनरनुसार या आठवड्याची OTT वॉचलिस्ट तयार करता येणार आहे.
Bigg Boss 20: घरात एन्ट्री करताच माही विजचा हुकूम सुरू; कोणाकडून बनवली चहा, तर कोणाकडून उचललं सामान!






