Ramayana Movie :२७ देशांमध्ये ‘रामायण’चा डंका! रणबीर कपूरच्या चित्रपटाने रचला इतिहास; भारतीय चित्रपटसृष्टीत नवा विक्रम

Ramayana Movie :रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाने २७ देशांमध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरण्याचा विक्रम केला आहे. अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांत चित्रपटाची ऐतिहासिक कामगिरी.
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Published on: 
Updated on: 

Ramayana Movie :नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अद्याप सुरूच आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यातही हा पौराणिक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये टिकून आहे. जगभरात निर्मात्यांना अपेक्षित असलेले ब्लॉकबस्टर यश मिळाले नसले, तरी आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ‘रामायण’ हा २७ देशांमध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. आतापर्यंत कोणत्याही भारतीय चित्रपटाला अशी कामगिरी करता आलेली नाही.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी गुरुवारी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या आंतरराष्ट्रीय यशाची माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, अमेरिका, युनायटेड किंगडम, इंडोनेशिया आणि थायलंड यांसारख्या प्रमुख बाजारपेठांसह २७ देशांमध्ये ‘रामायण’ने भारतीय चित्रपटांच्या कमाईचे जुने विक्रम मोडले आहेत. व्हिएतनाम, कंबोडिया आणि अनेक युरोपीय देशांमध्येही चित्रपटाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

आग्नेय आशियात ‘रामायण’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

आग्नेय आशियाई बाजारपेठांमध्ये ‘रामायण’ला विशेष प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कंबोडिया आणि सिंगापूरसारख्या देशांमध्ये रामायणाच्या कथेची आणि त्याच्याशी संबंधित सांस्कृतिक श्रद्धांची लोकप्रियता असल्याने चित्रपटाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे.

याशिवाय, सोनी पिक्चर्सच्या व्यापक आंतरराष्ट्रीय वितरणामुळे हा चित्रपट स्लोव्हाकिया, युक्रेन, लाटव्हिया, जॉर्जिया, आर्मेनिया आणि कॅरिबियनसारख्या नव्या बाजारपेठांमध्येही प्रदर्शित झाला. त्यामुळे भारतीय चित्रपटांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.

भारतातील कमाई मंदावली, पण परदेशात पुन्हा पकडला वेग

चित्रपटाच्या सुरुवातीच्या प्रदर्शनाच्या तुलनेत आता बॉक्स ऑफिसवरील कमाईचा वेग काहीसा मंदावला आहे. पहिल्या आठवड्यात सलग सात दिवस जगभरात १०० कोटी रुपयांहून अधिक कमाई करणाऱ्या ‘रामायण’ची भारतातील दैनंदिन कमाई आता १० कोटी रुपयांच्या खाली आली आहे. मात्र, परदेशातील बाजारपेठांमध्ये तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाने पुन्हा वेग पकडला आहे.

प्रदर्शनाच्या २२ व्या दिवशी, म्हणजेच गुरुवारी, चित्रपटाने परदेशातील बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा १० लाख डॉलर्सहून अधिक कमाई केली. भारतातील चित्रपटाचे निव्वळ कलेक्शन ९९२ कोटी रुपये, तर एकूण कलेक्शन १,१८५ कोटी रुपयांवर पोहोचल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी भारतात चित्रपटाचे निव्वळ कलेक्शन १,००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची अपेक्षा आहे.

‘रामायण’ जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत चौथ्या स्थानी

भारतातील कमाईचा १,००० कोटी रुपयांचा टप्पा पार केल्यास ‘धुरंधर द रिव्हेंज’नंतर हा टप्पा गाठणारा ‘रामायण’ दुसरा हिंदी चित्रपट ठरेल. परदेशातील बाजारपेठांमध्ये चित्रपटाची कमाई ६४ दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक झाली आहे.

दरम्यान, चित्रपटाचे जगभरातील एकूण कलेक्शन १,७७७ कोटी रुपयांवर पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत ‘रामायण’ चौथ्या क्रमांकावर आहे. आगामी आठवड्यात ‘बाहुबली २’ आणि ‘धुरंदर २’ यांना मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.