(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर ‘रामायणम्’च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. ‘हा रामयुगाचा आरंभ आहे!’ असा संदेश देत त्यांनी या महाकाव्याच्या भव्य सिनेमॅटिक प्रवासाची झलक दाखवली. या घोषणेमुळे चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रामायणम्: पार्ट १’ जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रीमियम फॉरमॅट्समध्ये प्रदर्शित होणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अॅडव्हान्स बुकिंग सुरू होणार असल्याने चाहत्यांना चित्रपटाची तिकिटे आगाऊ बुक करण्याची संधी मिळणार आहे.
रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत; यश साकारणार रावण
निर्मात्यांनी प्रदर्शित केलेल्या नव्या पोस्टरमध्ये रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसत आहेत. तर अभिनेता यश रावणाच्या भव्य रूपात पाहायला मिळत आहे. या पोस्टरमध्ये प्रमुख पात्रांची वेशभूषा, त्यांचे लुक आणि चित्रपटाच्या भव्य विश्वाची झलक पाहायला मिळते.
या चित्रपटात सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. भारतीय महाकाव्याची कथा भव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
‘रामायणम्’ हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग ५ नोव्हेंबर २०२६ रोजी, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. चित्रपट IMAX फॉरमॅटमध्येही पाहता येणार आहे.
नितेश तिवारींचे दिग्दर्शन; भव्य निर्मितीची जबाबदारी नमित मल्होत्रांकडे
‘रामायणम्’चे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे. नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओजने DNEG आणि यश यांच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटातील दृश्यांना भव्य स्वरूप देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
नवरात्रोत्सवाच्या शुभदिनी करण्यात आलेल्या या घोषणेमुळे ‘रामायणम्’च्या प्रदर्शनाची चर्चा पुन्हा रंगली आहे. आता रणबीर कपूरसह संपूर्ण कलाकारांचा अभिनय आणि या महाकाव्याचे भव्य चित्ररूप मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.






