(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Salman Khan: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान त्याच्या आगामी ‘मॉन्स्टर’ या पॅन-इंडिया अॅक्शन चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक वामशी पैडीपल्ली यांच्या या चित्रपटासाठी सलमान खान विशेष मेहनत घेत आहे. चित्रपटातील त्याची भूमिका अधिक प्रभावी बनवण्यासाठी निर्मात्यांनी खास रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे. सलमान आता चित्रपटाच्या अॅक्शन सीन्ससाठी ५० दिवसांच्या आव्हानात्मक शूटिंग शेड्यूलची तयारी करत आहे.
‘मॉन्स्टर’मधील अॅक्शन सीन्सच्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी मुंबईतील मीरा रोड येथील एका स्टुडिओमध्ये विशेष सेट उभारला आहे. या चित्रपटात भव्य व्हिज्युअल इफेक्ट्सपेक्षा वास्तववादी अॅक्शनवर अधिक भर दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सलमान खानचा दमदार आणि रॉ अंदाज मोठ्या पडद्यावर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईत सुरू झाले चित्रपटाचे शूटिंग
‘मॉन्स्टर’च्या मुख्य चित्रीकरणाला एप्रिल २०२६ च्या मध्यात मुंबईत सुरुवात झाली. त्यानंतर चित्रपटाच्या शूटिंगने वेग घेतला. याच वर्षी चित्रपटाच्या टीमने गोरेगावमध्ये सहा आठवड्यांचे शूटिंग शेड्यूल पूर्ण केले. या टप्प्यात मोठ्या प्रमाणावरील अॅक्शन सीन्स, गर्दीची दृश्ये आणि अफगाणिस्तानमधील एका गावाचा भव्य सेट उभारून चित्रीत केलेल्या प्रसंगांचा समावेश होता.
चित्रपटातील अॅक्शन सीन्समध्ये सलमान खान आपल्या विरोधकांशी थेट भिडताना दिसणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
सलमान खान त्याच्या व्यस्त वेळापत्रकासाठी ओळखला जातो. ‘बिग बॉस २०’च्या जबाबदाऱ्यांसोबतच ‘मॉन्स्टर’मधील शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक अॅक्शन सीन्सचे शूटिंग सांभाळण्याचे आव्हान त्याच्यासमोर आहे. उपलब्ध माहितीनुसार, चित्रपटाचे चित्रीकरण नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
ईद २०२७ ला चित्रपट प्रदर्शित होणार?
चित्रीकरणाचा अंतिम टप्पा पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाची टीम पोस्ट-प्रॉडक्शनच्या कामाला सुरुवात करणार आहे. चित्रपटाचे संपादन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि इतर तांत्रिक कामे पूर्ण करून ‘मॉन्स्टर’ ईद २०२७ ला मोठ्या पडद्यावर आणण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे. आता सलमान खानचा हा अॅक्शनपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येतो आणि त्याचा लूक किती दमदार ठरतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.






