(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Sara Ali Khan: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या आगामी ‘उडता तीर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दसऱ्याच्या निमित्ताने सारा अली खान आणि अभिनेता आयुष्मान खुराना यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिराला भेट देत दर्शन घेतले. यावेळी दोघांनीही दरबार साहिबमध्ये प्रार्थना केली. त्यांच्या या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, मंदिर परिसरात सारा भावुक होऊन रडताना दिसल्याचा व्हिडिओही चर्चेत आला आहे.
साराने सोशल मीडियावर आयुष्मान खुरानासोबतचे काही फोटो शेअर करत या खास भेटीची झलक चाहत्यांना दाखवली. यावेळी दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. साराने डोक्यावर ओढणी घेतली होती. हात जोडून प्रार्थना करतानाचे तिचे फोटोही लक्ष वेधून घेत आहेत.
या फोटोंसोबत साराने दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. सर्वांच्या आयुष्यात प्रेम, सौभाग्य आणि आनंदाचा वर्षाव होवो, अशी सदिच्छाही तिने व्यक्त केली.
सारा अली खान आणि आयुष्मान खुराना यांच्या ‘उडता तीर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्यांनी सुवर्ण मंदिराला भेट दिली. हा चित्रपट मूळतः ९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून, चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले जात आहे.
‘उडता तीर’ या चित्रपटात सारा अली खान आणि आयुष्मान खुराना यांच्यासोबत राहुल बोस, राम कपूर, सुहेल नय्यर, गुलशन ग्रोव्हर, मुकुल देव, रघुबीर यादव, बृजेंद्र काला, संदीप आनंद, सुप्रिया पिळगावकर आणि स्मिता तांबे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
सध्या सुवर्ण मंदिरातील साराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. तिच्या भावुक क्षणांमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नसले, तरी या व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.






