(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Taapsee Pannu: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या ‘गांधारी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ३ सप्टेंबर रोजी Netflix वर प्रदर्शित झालेल्या या अॅक्शन-थ्रिलरला रिलीजच्या काही दिवसांतच विविध देशांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. चित्रपटातील तापसीच्या दमदार भूमिकेचीही चर्चा होत आहे.
भारतीय मातीशी आणि संस्कृतीशी जोडलेली कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असल्याने तापसी पन्नू स्वतःही भारावून गेली आहे. सोशल मीडियावर प्रतिक्रिया शेअर करताना तिने ‘गांधारी’ला मिळत असलेल्या जागतिक प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला.
‘गांधारी’च्या ग्लोबल यशाने तापसी भारावली
तापसीने सांगितले की, चित्रपट रिलीज होण्यापूर्वी तिच्यासाठी हा काळ अत्यंत तणावपूर्ण होता. चित्रपट एकाच वेळी जगभरातील प्रेक्षकांसाठी उपलब्ध होत असल्याने तो किती लोक पाहतील आणि त्याला कसा प्रतिसाद मिळेल, याची उत्सुकता आणि चिंता दोन्ही होती.
तिच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या आकडेवारीत ‘गांधारी’ने भारतासह बांगलादेश, पाकिस्तान, यूएई, बहरीन, ओमान, श्रीलंका आणि मॉरिशस अशा आठ देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर ट्रेंडिंग केले. तसेच कुवेत आणि नायजेरियामध्ये चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे तिने सांगितले.
तापसीने पुढे सांगितले की, रिलीजच्या अवघ्या तीन दिवसांत ‘गांधारी’ जगभरातील Netflix टॉप टायटल्समध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचला. याशिवाय तब्बल ४१ देशांमध्ये चित्रपट ट्रेंड करत असल्याचेही तिने सांगितले.
विशेष म्हणजे, ग्वाडेलूपसारख्या देशांमध्येही चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून ती आश्चर्यचकित झाली. याशिवाय पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, सौदी अरेबिया, स्पेन, थायलंड आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांमध्येही ‘गांधारी’ ट्रेंड करत असल्याचे तिने नमूद केले.
Netflix च्या उपलब्ध चार्ट डेटामध्येही ४ सप्टेंबरला ‘गांधारी’ भारत, बांगलादेश, बहरीन, मॉरिशस, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि यूएई यांसारख्या देशांमध्ये टॉप मूव्हीजमध्ये दिसत होता.
View this post on Instagram
‘गांधारी’ची कथा भारतीय संस्कृती आणि आपल्या मुळांशी खोलवर जोडलेली असल्याचे तापसीने म्हटले. त्यामुळे ही कथा प्रामुख्याने भारतीय प्रेक्षकांनाच अधिक जवळची वाटेल, अशी तिची सुरुवातीची भावना होती.
मात्र, चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून ती भावुक झाली. ४० हून अधिक देशांमध्ये भारतीय कथेवर आधारित चित्रपट ट्रेंड होत असल्याचा अनुभव तिच्यासाठी अविस्मरणीय असल्याचे तिने सांगितले.
‘आता मला नकाशा उघडून पाहावा लागेल!’
‘गांधारी’ला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल बोलताना तापसीने मार्टिनिक आणि लक्झेंबर्गसारख्या देशांतील ट्रेंडिंग रँकिंगचाही उल्लेख केला. काही देशांबद्दल आपल्यालाच फारशी माहिती नसल्याचे सांगत तिने या अनुभवावर मजेशीर प्रतिक्रिया दिली.
मार्टिनिकमध्ये चित्रपटाच्या रँकिंगमध्ये झालेली वाढ पाहून आपल्याला आता नकाशा उघडून हा देश नेमका कुठे आहे, हे पाहावे लागेल, असे तापसीने सांगितले.
‘गांधारी’ला मिळालेल्या जागतिक प्रेमामुळे यंदाची जन्माष्टमी आपल्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारी ठरेल, असेही तापसीने म्हटले. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल तिने सर्वांचे आभार मानले.
दरम्यान, ‘गांधारी’मध्ये तापसी पन्नूने बानीची भूमिका साकारली आहे. मुलीचे अपहरण झाल्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी आई कोणत्याही थराला जाऊ शकते, याची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. देवाशीष मखीजा दिग्दर्शित आणि कनिका ढिल्लन लिखित ‘गांधारी’मध्ये इश्वाक सिंग, छाया कदम, स्वस्तिका मुखर्जी, मिता वशिष्ठ आणि जतीन सरना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.






