(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Vidya Balan: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या परखड वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सेलिब्रिटींना त्यांच्या शारीरिक दिसण्यावरून ट्रोल करण्याचे प्रकार वारंवार घडतात. विशेषतः प्रसूतीनंतर महिलांच्या वाढलेल्या वजनावरून त्यांना लक्ष्य केले जाते. अशाच प्रकारच्या बॉडी शेमिंगविरोधात विद्या बालनने आवाज उठवला असून, ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. तिच्या वक्तव्याची सध्या चर्चा होत आहे.
अभिनेत्री कतरिना कैफला प्रसूतीनंतर वाढलेल्या वजनावरून ट्रोल करण्यात आल्याची चर्चा आहे. याआधी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनलाही रॅम्प वॉकनंतर तिच्या दिसण्यावरून टीकेचा सामना करावा लागला होता. सेलिब्रिटींच्या शरीरावरून त्यांच्यावर टीका करण्याच्या या प्रकारावर अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याच पार्श्वभूमीवर विद्या बालनने ट्रोलर्सना सुनावले. इतरांच्या दिसण्यावरून त्यांची निंदा करणाऱ्या लोकांनी आधी स्वतःकडे पाहावे, असे ती म्हणाली. एखाद्याच्या शरीरावरून त्याची थट्टा करणे ही अत्यंत चुकीची गोष्ट असल्याचेही तिने स्पष्ट केले.
“आता AI कडूनच मुलं जन्माला घालून घ्या!”
ट्रोलर्सना उत्तर देताना विद्या बालन म्हणाली, “ही अत्यंत घाणेरडी गोष्ट आहे. जे लोक इतरांची निंदा करतात, त्यांनी स्वतःकडे आरशात पाहावे. कुठेतरी हे लोक स्वतःवरच नाराज आहेत आणि त्यांच्यातच काहीतरी कमी आहे, म्हणूनच ते इतरांमध्ये दोष शोधत आहेत.”
पुढे तिने उपरोधिक शब्दांत ट्रोलर्सना सुनावले. “दुसरी गोष्ट म्हणजे, मुलाला जन्म दिल्यानंतर स्त्रियांचे वजन वाढते. तुम्हाला या गोष्टीचा इतकाच त्रास होत असेल, तर सतत AI, AI करता ना, मग AI कडूनच मुलं जन्माला घालून घ्या,” अशा शब्दांत तिने आपला संताप व्यक्त केला.
प्रसूतीनंतर महिलांच्या शरीरात बदल होतात
प्रसूतीनंतर महिलांच्या शरीरात हार्मोन्सशी संबंधित अनेक बदल होतात. त्यामुळे त्यांच्या वजनात आणि शारीरिक दिसण्यातही बदल होऊ शकतात. या नैसर्गिक प्रक्रियेकडे समजुतीने पाहण्याची गरज असल्याचे विद्या बालनने आपल्या वक्तव्यातून अधोरेखित केले.
एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक दिसण्यावरून तिची थट्टा करण्याचा किंवा तिला ट्रोल करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असेही तिने स्पष्ट केले. महिलांच्या शरीरावरून त्यांच्याबद्दल मत व्यक्त करणे आणि त्यांना कमी लेखणे चुकीचे असल्याचा मुद्दा तिने मांडला.
आई झाल्यानंतर महिलांचे वजन किती असावे, त्यांनी किती लवकर पूर्वीसारखा फिटनेस मिळवावा किंवा त्यांचे शरीर कसे दिसावे, याचे नियम ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही. प्रत्येक महिलेचा अनुभव आणि शरीर वेगळे असते. त्यामुळे प्रसूतीनंतर महिलांच्या दिसण्यावरून त्यांच्यावर टीका करण्याऐवजी त्यांच्या परिस्थितीचा आदर करणे महत्त्वाचे आहे.
विद्या बालनच्या या वक्तव्यातून सोशल मीडियावरील बॉडी शेमिंगचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. एखाद्याच्या शरीरावरून त्याची खिल्ली उडवण्याचा अधिकार ट्रोलर्सना कोणी दिला, असा सवाल तिच्या भूमिकेतून उपस्थित होत आहे.






