Nikhil Damle: ‘२०२६ मध्ये वाचनाची गोडी वाढली, मराठा इतिहासाचा घेतला सखोल अभ्यास’, निखिल दामलेचा वर्षभरातील खास अनुभव

Nikhil Damle: कमळी मालिकेतून सर्वांच्या मनात घर केलेला अभिनेता निखिल दामलेने आपलं २०२६ हे वर्ष कसं गेलं याबाबत अनुभव शेअर केले आहेत. हे वर्ष चांगल्या सवयींची सुरूवात करणारं ठरल्याचं त्याने सांगितले
'कमळी'फेम निखिल दामलेचे सरते वर्ष कसे गेले?
अभिनेता निखिल दामलेने शेअर केला सरत्या वर्षाचा अनुभव कमळीतील मुख्य भूमिका साकारणार निखिल दामलेने सरत्या वर्षाचे अनुभव सांगितले
Published on: 
Updated on: 
  • ‘कमळी’ फेम निखिलने २०२६ चा अनुभव केला शेअर

  • नव्या वर्षातील संकल्पात काय जोडणार

  • २०२६ चांगल्या सवयीने सुरू झाले, निखिलचा अनुभव 

सरत्या वर्षातील अनुभव, शिकवण आणि आठवणी सोबत घेऊन नव्या वर्षात काही नवीन गोष्टी करण्याचा संकल्प केला जातो. झी मराठीवरील 'कमळी' या मालिकेत ‘ऋषी ’ची भूमिका साकारणारा अभिनेता निखिल दामले याच्यासाठीही २०२६ हे वर्ष एका चांगल्या सवयीची सुरुवात करणारे ठरले.

निखिल दामले व्यक्त केल्या भावना 

आपल्या २०२६  च्या चांगल्या सवयी  आणि २०२७ च्या संकल्पांबद्दल सांगताना निखिल दामले म्हणाला ‘या वर्षात माझ्यात झालेला एक चांगला बदल म्हणजे मी आधीपेक्षा जास्त वाचन करू लागलो आहे. ही सवय मला आवडली असून, नवीन वर्षातही ती कायम ठेवायची आहे. या वर्षात मी 'छत्रपती संभाजी महाराजांची पत्रे', 'तुम्हारी औकात क्या है' (पियूष मिश्रा), 'द करेज टू बी डिसलाइक्ड', 'द हिडन हिंदू' यांसारखी पुस्तके वाचली. तसेच 'सभासद बखर' आणि 'शिवभारत काव्य' यांचाही अभ्यास केला.मराठा इतिहासातील मूळ कागदपत्रे आणि अस्सल ऐतिहासिक संदर्भ वाचण्याची मला विशेष आवड निर्माण झाली आहे.’

यातून निखिलला काय मिळाले? 

पुढे निखिलने सांगितलं की, ‘यातून नेमके काय घडले होते आणि कोणत्या गोष्टी केवळ दंतकथा आहेत, हे समजून घेता येते. तसेच आपल्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांना अधिक जवळून समजून घेण्याची संधी मिळते.  दरवर्षीप्रमाणे  यंदाही मी माझे नवीन वर्ष कुटुंबीय किंवा मित्रांसोबत साजरे करणार आहे. सध्या तरी काही खास प्लॅन केलेला नाही. आगामी वर्षात मला अभिनयाच्या बाबतीत आणखी चांगले आणि आव्हानात्मक काम करायला आवडेल. प्रेक्षकांनी माझ्या कामावर यापुढेही असेच प्रेम करावे, ही अपेक्षा आहे. त्याचबरोबर माझ्या आरोग्याकडे आणि व्यायामाकडे अधिक लक्ष देऊन फिटनेसच्या बाबतीत नियमित राहण्याचा माझा संकल्प आहे.’

२०२६ मध्ये वाचनातून नवी आवड जोपासणाऱ्या निखिलसाठी २०२७ हे वर्ष स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे घडवण्याचे असणार आहे.

कमळीमध्ये साकारतोय ऋषी

निखिल दामले सध्या झी मराठीवरील कमळी या मालिकेत प्रमुख भूमिका ऋषी साकारत आहे. एका व्यावसायिक घरात वाढलेला आणि अत्यंत संवेदनशील पण तितकाच योग्य निर्णय घेणारा अशी त्याची व्यक्तिरेखा असून निखिलची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. विजया बाबरसह त्याची जोडीही कमालीची जमली असून आता कमळी आणि ऋषी यांचं लग्न कधी होणार याचीच प्रेक्षक वाट पाहत आहेत.