

नवी दिल्ली : देशातील न्यायव्यवस्था आणि तुरुंगांच्या स्थितीबाबत एक धक्कादायक जागतिक तुलनात्मक आकडेवारी समोर आली आहे. 'डेटा फॉर इंडिया'ने प्रसिद्ध केलेल्या जागतिक तुरुंगविषयक आकडेवारीच्या विश्लेषणानुसार, देशातील एकूण कैद्यांपैकी तब्बल ७७ टक्के कैदी हे विचाराधीन आहेत. म्हणजेच तुरुंगातील प्रत्येक चार देशांत भारत कैद्यांपैकी तीन जणांच्या खटल्यांचा दुसऱ्या स्थानी निकाल अद्याप लागलेला नाही. त्यांना न्यायालयाने अद्याप दोषी ठरवलेले नाही.
जगातील १४६ देशांतील उपलब्ध आकडेवारीची तुलना केली असता, भारतापेक्षा अधिक विचाराधीन कैद्यांचे प्रमाण केवळ कॅरेबियन देश हैतीमध्ये (८२ टक्के) आहे. या यादीत भारतानंतर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (७५ टक्के), नायजेरिया (७२ टक्के), पॅराग्वे (७१ टक्के) आणि पाकिस्तान (६८ टक्के) यांचा क्रमांक लागतो. विश्लेषकांच्या मते, ही आकडेवारी दर लाख लोकसंख्येमागील कैद्यांची संख्या दर्शवत नाही, तर तुरुंगातील एकूण कैद्यांपैकी अद्याप शिक्षा न झालेल्या विचाराधीन कैद्यांचे प्रमाण दर्शवते. दर लाख लोकसंख्येमागील कैद्यांच्या संख्येचा विचार करता भारताचा समावेश जगातील सर्वांत कमी प्रमाण असलेल्या देशांमध्ये होतो. मात्र, तुरुंगातील एकूण कैद्यांपैकी तीन-चतुर्थांश कैदी विचाराधीन असल्याने या निकषावर भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, कायदेविषयक तज्ज्ञ आणि तुरुंग सुधारणांशी संबंधित विश्लेषकांच्या मते, न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांचा मोठा अनुशेष, पोलिस तपासातील विलंब आणि जामीन प्रक्रियेतील गुंतागुंत ही विचाराधीन कैद्यांची संख्या वाढण्यामागील प्रमुख कारणे आहेत. अनेक प्रकरणांमध्ये गरीब आणि वंचित घटकांतील कैद्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर होऊनही जामीनदार मिळत नाही किंवा जामिनासाठी आवश्यक रक्कम उभी करता येत नाही. त्यामुळे त्यांना दीर्घकाळ तुरुंगात राहावे लागते.